4 Years Old Girl Died In Stray Dog Attack In Bengaluru: गेल्या काही दिवसांपासून देशभरात भटके कुत्रे आणि त्यांचे नागरिकांवर होणारे हल्ले हा चर्चेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीतील सर्व भटक्या कुत्र्यांना प्राणी निवारा केंद्रात हलवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर देशभरातून या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अशात आता कुत्र्याच्या हल्ल्यामुळे बंगळुरूमध्ये एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कर्नाटकातील दावणगिरी येथे सुमारे चार महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने खदीरा बानू या मुलीला रेबीज झाले होते. बेंगळुरू येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे.
घराबाहेर खेळत असताना खदीरा या मुलीवर कुत्र्याने हल्ला केला होता. यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. खासगी रुग्णालयातील उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले होते. पण, काही दिवसांपूर्वी तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला तेव्हा, तिला रेबीज झाल्याचे निदान झाले.
मृत मुलीच्या चुलत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी खदीराच्या उपचारासाठी ९ ते १० लाख रुपये खर्च केले आहेत. ते म्हणाले, “तिचा वाचवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. तिला आम्ही बंगळुरूच्या राजीव गांधी रुग्णालयात दाखल केले होते. दावणगिरीत मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे आहेत आणि या समस्येची आतापर्यंत कोणीही दखल घेतलेल नाही.” याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
मृत मुलीचे काका पुढे म्हणाले की, “आमच्या मुलीबरोबर जे घडले ते कोणाबरोबरही घडू नये. कुत्र्याने तिच्या चेहऱ्याचा चावा घेतला होता. डॉक्टरांनी औषधोपचार करूनही इन्फेक्शन सर्वत्र पसरले.”
दरम्यान, कर्नाटकमध्ये या वर्षी आतापर्यंत २.४ लाख कुत्र्यांच्या चाव्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि रेबीजमुळे १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपूर्वी जेडीएसचे विधान परिषद आमदार एसएल भोजेगौडा यांनी चिक्कमंगळुरूमधील भटक्या कुत्र्यांच्या समस्येबद्दल सभागृहात भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, “नागरिकांना, विशेषतः लहान मुलांना रस्त्यावर चालता येत नाही. आमदार, मंत्री किंवा न्यायाधीशांची मुले कारमधून प्रवास करत असल्याने त्यांच्यावर याचा परिणाम होत नाही, पण सामान्य नागरिकांच्या मुलांचे काय? तुम्ही कधी विचार केला आहे का की, ते इतक्या दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या समस्येला कसे तोंड देत आहेत?”