निसर्गाच्या रौद्र तांडवापुढे खचलेल्या आणि पुरात सापडलेल्या हरिद्वारमध्ये शुक्रवारी ४० मृतदेह सापडल्याने संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या या नैसर्गिक आपत्तीतील मृतांची संख्या १९० वर गेली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती उत्तराखंडचे मुख्य सचिव राकेश शर्मा यांनी व्यक्त केली आहे.
केदारनाथ आणि बद्रीनाथमध्ये भाविकांच्या सुटकेसाठी आणखी ४० हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. तरी अडकलेल्या भाविकांची संख्या तब्बल नऊ हजार असल्याने आणि खचणाऱ्या कडय़ांच्या कवेत अन्नपाण्याविना एकेक क्षण घालविणेही यातनादायी असल्याने कितीही हेलिकॉप्टर तैनात केली तरी ती अपुरीच पडत आहेत.
मदतकार्यासाठी २५० भाविक अडकलेल्या केदारनाथ क्षेत्रावर प्रथम लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यानंतर नऊ हजार भाविक अडकलेल्या बद्रीनाथकडे धाव घेतली जाणार आहे. उत्तराखंडचे कृषीमंत्री हरक सिंग रावत यांनी शुक्रवारी केदारनाथची पाहणी केली. ते म्हणाले की, केदारनाथचे या आपत्तीत सर्वाधिक नुकसान झाले असून तेथील स्थिती पूर्ववत व्हायला पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. या तडाख्यातही केवळ मंदिर टिकून असून आजूबाजूचा सर्व परिसर उद्ध्वस्त झाला आहे.
उत्तराखंडमध्ये राजस्थआनचे दोन हजार लोक अडकले असून त्यांच्या आप्तांसाठी राजस्थान सरकारने चार मदतकक्ष स्थापन केले आहेत. ऋषीकेश, हरिद्वार, डेहराडूनमधील जॉली ग्रँट विमानतळ येथे हे कक्ष कार्यरत असून भाविकांचे आप्त व स्थानिक प्रशासनात समन्वय साधण्याचे काम ते करीत आहेत.
हिमाचल प्रदेशात किनौर जिल्ह्य़ात मदतकार्य वेगात आहे. पूह, नाको आणि काझा भागांतही अनेक लोक अडकल्याची भीती असून तेथे शोध सुरू आहे. हवाई दलाची दोन विमाने आणि राज्य सरकारचे एक हेलिकॉप्टर या कार्यात जुंपले आहे. आतापर्यंत ५०० नागरिकांची या विमानांनी सुटका केली आहे.
‘केसरी मेरीगोल्ड’चे आवाहन
‘केसरी मेरीगोल्ड’ तर्फे आयोजित चार धाम यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांच्या सोयीसाठी ‘केसरी’च्या ‘आपल्या माणसा’समवेत ही मंडळी सुरक्षित असल्याचे संचालकांनी कळविले आहे. चार गटापैकी एका गटातील मंडळींना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी त्यांनाही कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू असून संबंधितांच्या नातेवाईकांनी केसरी कार्यालयात ९१६७७७४९७० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संचालकांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 bodies found in haridwar death toll in floods reaches
First published on: 22-06-2013 at 12:27 IST