जम्मू-काश्मीरसंदर्भातील संविधानामधील कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यामध्ये दहशतवादी कारवायांची संख्या कमी झाली आहे. काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सैन्यासोबतच्या चकमकीमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या ही कलम ३७० रद्द झाल्यानंतर वाढल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय. त्याचवेळी या संघर्षामध्ये अनेक भारतीय जवानही शहीद झाले आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्यात आला. त्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सुरक्षा यंत्रणांनी चालवलेल्या मोहिमांमध्ये दहशतवाद्यांना कंठस्थान घातल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीय.

एएनआने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भातील माहिती राज्यसभेमध्ये दिली. कलम ३७० रद्द करण्यात आल्यापासून आतापर्यंत ४३९ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय, असं राय यांनी स्पष्ट केलंय. तसेच या हल्ल्यांमध्ये पाच कोटींहून अधिक रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालंय.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतर ४३९ दहशतवादी ठार करण्यात आलेत. या कालावधीमध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवादाच्या ५४१ घटना घडल्यात. या हल्ल्यांमध्ये ९८ सामान्य नागरिकांची मृत्यू झालाय.

नित्यानंद राय यांनी राज्यसभेमध्ये दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांशी मुकाबला करताना १०९ जवान आणि सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचारी कलम ३७० रद्द केल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत शहीद झालेत. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर ऑगस्ट २०१९ ते ऑगस्ट २०२१ दरम्यानच्या कालावधीत सर्वसामान्यांचे दहशतवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावण्याचं प्रमाण ४९ टक्क्यांनी कमी झालंय.

राय यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व घटनांमध्ये सार्वजनिक संपत्तीची मोठी हानी झालेली नाही. मात्र खासगी संपत्तीला काही प्रमाणामध्ये या हल्ल्यामध्ये नुकसान झालंय. सरकारने नुकसानाची आकडेवारी देताना दिलेल्या माहितीनुसार कलम ३७० रद्द झाल्यापासून आतापर्यंत ५.१ कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही माहिती दिलीय. ३१ जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशना ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सर्तर १४ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान होणार आहे.