मनिला : फिलिपाईन्समध्ये उष्णकटिबंधीय वादळ ‘नाल्गा’मुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे ४७ जण मृत्युमुखी पडले. फिलिपाईन्सच्या दक्षिण भागास मोठा फटका बसला. अद्याप सुमारे ६० ग्रामस्थ बेपत्ता झाल्याची भीती आहे. भूस्खलनामुळे खडक, झाडे व मातीच्या ढिगाऱ्यात ते गाडले गेल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

गुरुवारी रात्री ते शुक्रवार पहाटेपर्यंत मागुइंदानाओ प्रांतातील तीन शहरांमध्ये पुरात किमान ४२ जण बुडाले. यापैकी काही जण चिखल-दलदलीत सापडले, असे पाच प्रांतांच्या मुस्लीम स्वायत्त प्रदेशाचे अंतर्गत मंत्री नागुइब सिनारिम्बो यांनी सांगितले. हे वादळ शनिवारी पहाटे पूर्व भागात कॅमेरिन्स सूर प्रांतात धडकले.