Waqf Property : राज्य वक्फ बोर्डाच्या अंतर्गत नोंदणी असलेल्या अहमदाबाद येथील दोन ट्रस्टच्या जमिनीवरील इमारतींचे भाडे १७ वर्षांपासून वसूल करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. इतकी वर्षे हे आरोपी ट्रस्टी असल्याचे भासवून हे भाडे गोळा करत होते, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

शहरातील गायकवाड हवेली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरनुसार, कांचनी मशीद ट्रस्ट आणि शाह बडा कसम ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरील सुमारे १०० घरे आणि दुकानांचे भाडे हे पाच जण वसूल करत होते.

“वक्फ बोर्डाच्या अंतर्गत नोंदणी असलेल्या ट्रस्टच्या मालमत्तेचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर केल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला,” अशी माहिती डीसीपी भरत राठोड यांनी दिली.

वक्फ मालमत्ता ही धार्मिक किंवा धर्मादाय कार्यासाठी देण्यात आलेली असते. अशा मालमत्तेपासून मिळालेले उत्पन्न हे साधारणपणे धार्मिक कामे किंवा लोकांच्या फायद्यासाठी वापरले जाते.

“आरोपींनी दोन्ही ट्रस्टच्या मालकीच्या ५,००० चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवर बेकायदेशीर बांधकाम केले. त्यांनी २००८ ते २०२५ दरम्यान सुमारे १०० इमारती (घरे आणि दुकाने) बांधल्या आणि त्यांचे मासिक भाडे वसूल केले,” असेही पोलिसांनी सांगितले.

आरोपींची ओळख पटली

या पाचही आरोपींची ओळख पटली असून त्यांची नावे सलीम खान पठाण, मोहम्मद यासर शेख, महमूदखान पठाण, फैज मोह्म्मद चोबदार आणि शाहिद अहमद शेख अशी आहेत. सलिम खान पठाण हा गुन्हेगार असून त्याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत.

पाचपैकी कोणताही आरोपी हा दोन्हीपैकी एकाही ट्रस्टचा सदस्य नाही, असे तक्रार करणाऱ्या मोहमद रफिक अन्सारी यांनी म्हटले आहे. अन्सारी हे कांचनी मशीद ट्र्सच्या जमिनीवर उभारलेल्या एका इमारतीत भाडेकरू आहेत.

आरोपींनी कांचनी मशीद ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवर १५ दुकाने बांधल्याचा आरोप आहे. ही जमीन पूर्वी अहमदाबाद महानगरपालिकेला (एएमसी) उर्दू शाळेसाठी देण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

आरोपींनी वसूल केलेले भाडे ट्रस्टच्या खात्यात जमा केले नाही किंवा एएमसीला दिले नाही. अशा प्रकारे त्यांनी एएमसी आणि वक्फ बोर्डाची फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे.