पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय हवाई दलाच्या दोन लष्कराच्या विमानांनी २५० हून अधिक भारतीयांना सुदानमधून बाहेर काढले. त्यानंतर नौदलाच्या जहाजाने आणखी २७८ नागरिकांची सुटका केली. अधिकृत आकडेवारीनुसार संघर्षग्रस्त सुदानमधून आतापर्यंत एकूण ५३० भारतीयांची सुटका करण्यात आली आहे.
‘ऑपरेशन कावेरी’ स्थलांतर मोहिमेंतर्गत भारताने सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे पारगमन सुविधा उभारली आहे. सर्व भारतीयांना सुदानमधून बाहेर काढल्यानंतर त्यांना सौदी अरेबियातील या शहरात नेण्यात आले आहे. नौदलाच्या ‘आयएनएस सुमेधा’ने मंगळवारी २७८ भारतीयांची पहिली तुकडी सुदानबाहेर नेली. त्यानंतर काही तासांनी भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारतीय हवाई दलाच्या ‘सी१३०जे’ हे अवजड वाहतूक करणारे विमान सुदान बंदरावर उतरले. त्याच्या पाठोपाठ ‘सी१३०जे’ हे दुसरे विमानही येथे उतरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ‘ट्वीट’द्वारे सांगितले, की ‘ऑपरेशन कावेरी’ सातत्याने सुरू असून, ‘सी१३०जे’ या पहिल्या विमानाद्वारे १२१ व दुसऱ्या विमानाने १३५ भारतीय नागरिकांना सुदानमधून बाहेर काढून जेद्दाह येथे आणण्यात आले. भारताने सुदानमधील भारतीयांच्या सुटकेच्या प्रक्रिोतील समन्वयासाठी जेद्दाह येथे नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे या मोहिमेची देखरेख करण्यासाठी जेद्दाह येथे पोहोचले आहेत. जेद्दाह येथून भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमानाद्वारे या सर्व भारतीयांना भारतात आणले जाणार आहे. सुदानमधील लष्कर आणि निमलष्करी दलात गेल्या १२ दिवसांपासून सध्या रक्तरंजित संघर्ष चिघळला असून, आतापर्यंत ४०० जण मृत्युमुखी पडले आहेत.