Crime News : ५६ वर्षांच्या एका महिलेने तिच्या ३३ वर्षीय प्रियकरासह संगनमत करत पतीच्या हत्येचा कट रचला आणि त्याची हत्याही घडवून आणली. या घटनेत महिलेने आपला पती बेपत्ता झाला आहे असा बनाव रचत पोलिसांत तक्रार नोंदवली होती. मात्र दोन महिन्यांनी या घटनेचा छडा पोलिसांनी लावला आणि या प्रकरणात महिलेला अटक केली. ही घटना कर्नाटकमधल्या चिकमंगळुरु या ठिकाणी घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मीनाक्षीअम्मा नावाच्या महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

मीनाक्षीअम्मा आणि तिचा ३३ वर्षीय प्रियकर प्रदीप या दोघांनी सिद्धेश, विश्वास यांच्यासह मिळून सुब्रमण्य याची हत्या केली. मीनाक्षीअम्मा आणि सुब्रमण्य हे दोघंही पती पत्नी होते. मात्र मीनाक्षीअम्माचं प्रदीपवर प्रेम जडलं. या प्रेमात पती अडसर होऊ लागल्याने या दोघांनी आणखी दोन साधीदारांना बरोबर घेत मीनाक्षीअम्माच्या पतीची हत्या केली. मीनाक्षीअम्माला या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नेमका या हत्येचा सुगावा कसा लागला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ जूनला मीनाक्षीअम्माने तिचा पती सुब्रमण्य बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तेव्हा तिने हे सांगितलं की ३१ मे पासून माझे पती सुब्रमण्य कामासाठी जातो म्हणून बाहेर पडले पण घरी परतलेले नाहीत. मी त्यांच्या मित्रांशीही संपर्क केला पण काहीही पत्ता लागलेला नाही म्हणून पोलीस ठाण्यात आले. यानंतर सुब्रमण्य यांचं मोबाइल लोकेशन कुठे आढळतं आहे का? याचा तपास करत शोध सुरु केला. ३ जूनच्या दिवशी पोलिसांना काडूर या रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर अर्धवट जळालेला एक पाय आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी यासंबंधीची चौकशीही स्थानिकांच्या मदतीने सुरु केली. ज्यानंतर या मृतदेहाचे इतर अवयवही सापडले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आढळलं?

सुब्रमण्यच्या टेलरिंग शॉपजवळचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं तेव्हा त्यांना हे दिसलं की प्रदीप, सिद्धेश आणि विश्वास हे तिघंही त्यांना कारमध्ये बसवत होते. हे फुटेज ३१ मे रोजीचं होतं. त्यानंतर आम्ही या तिघांना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी त्या तिघांनीही सुब्रमण्य यांच्या हत्येची कबुली दिली. जे मृतदेहाचे तुकडे सापडले होते ते सुब्रमण्य यांचे होते ही बाबही या कबुलीनंतर स्पष्ट झाली. प्रदीप आणि मीनाक्षीअम्मा या दोघांचे प्रेमसंबंध होते ज्यातून ही घटना घडली अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे.