‘आयसिस’ आणि अन्य दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटनच्या जवळपास ६०० नागरिकांना २०१२ पासून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री फिलीप हॅमण्ड यांनी दिली.
दहशतवादी गटांमध्ये सहभागी होण्यापासून या ६०० जणांना परावृत्त करण्यासाठी तुर्कस्तान आणि ब्रिटनने जे सहकार्याने प्रयत्न केले त्याची हॅमण्ट यांनी प्रशंसा केली. यापैकी काही जणांना ब्रिटनच्या सीमेवर रोखण्यात आले तर काही जणांना इस्तंबूलमध्ये आल्यानंतर अथवा वाटेतच रोखण्यात आले. तथापि, आम्ही दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे तुर्कस्तानने बहुसंख्य जणांना रोखले, असेही परराष्ट्रमंत्री म्हणाले. तुर्कस्तानला दिलेल्या माहितीनंतर त्यांनी अल्पावधीतच मोठी पावले उचलली हे लक्षणीय आहे.
काही जणांना तुर्कस्तानमध्ये विमानतळावर अटक करण्यात आली. विमान तुर्कस्तानला पोहोचण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी काही जणांबद्दलची माहिती कळविली होती, असे ‘डेली टेलिग्राफ’ने म्हटले आहे.
यापैकी काही जणांना ब्रिटनने माहिती पुरविल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत पकडण्यात आले. ब्रिटनमधील १४०० नागरिकांनी २०१२ पासून सीरियात जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यापैकी ४० जणांना रोखण्यात आले.