सिंगापूरमध्ये मोलकरणीचा मृत्यू होईपर्यंत छळ केल्याच्या गुन्ह्याची भारतीय वंशाच्या महिलेने कबुली दिली आहे. ६४ वर्षीय प्रेमा नारायणस्वामी यांनी आपल्या मुलीच्या मोलकरणीचा प्रचंड छळ केला होता. त्यात तिचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. प्रेमा यांनी आपल्यावरील आरोप मान्य केले असून, कोर्टाने ३० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पीडित मोलकरीण पिआंग ही मूळची म्यानमारची होती.

चॅनेल न्यूज एशियाच्या वृत्तानुसार, २४ वर्षीय मोलकरणीचा करण्यात आलेला छळ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. १४ महिने तिच्यावर अत्याचार सुरु होते. २६ जुलै २०१६ मोलकरणीचा मेंदूला झालेला दुखापत आणि वारंवार होणाऱ्या आघातामुळे मृत्यू झाला.

आपली मुलगी मोलकरणीवर शारिरीक अत्याचार करत असल्याची माहिती प्रेमा यांना मिळाली होती. यानंतर त्यांनीही तिच्यावर अत्याचार सुरु केले होते. लाथा, कानाखाली मारत तसंच उपाशी ठेवत त्यांनी तिचा छळ केला. त्यांनी तिचा गळा पकडत तसंच केस पकडून फरफटत नेलं असल्याचं सीसीटीव्ही दृश्यात कैद झालं होतं.

प्रेमा यांची मुलगी गायत्री मुरुगायनला २०२१ मध्ये कोर्टाने ३० वर्षांची शिक्षा सुनावली. महत्त्वाची बाब म्हणजे, गायत्री यांचे पती पोलीस अधिकारी होते. गायत्री यांना २८ गुन्ह्यांतर्गंत दोषी ठरवण्यात आलं होतं.

मे २०१५ मध्ये पीडित तरुणीने कुटुंबाकडे मोलकरीण म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. ती कामाला लागली तेव्हा तिचं वजन ३९ किलो होतं, आणि मृत्यू झाला तेव्हा फक्त ती २४ किलोंची होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी की ओन यांनी हे सदोष मनुष्यवधाचं हे सर्वात भयंकर प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान गायत्री यांचे पूर्वाश्रमीचे पती केविन यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असून त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.