उत्तर प्रदेशमध्ये पुरामुळे आणखी बळी गेल्याने आतापर्यंत पुराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६९ वर गेली आहे. राज्याच्या २४ जिल्ह्य़ांमधील २० लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा बसला आहे.

राज्यातील पूरबळींची संख्या ६९वर पोहोचली आहे. २४ जिल्ह्य़ांतील २५२३ खेडय़ांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने २० लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे, असे शनिवापर्यंत गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारे बचाव आयुक्तांच्या कार्यालयाने सांगितले.

नेपाळमधून उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी वाढत असून त्याने पूर्व उत्तर प्रदेशातील फार मोठय़ा भागात थैमान घातले आहे. याचा फटका बसलेल्या जिल्ह्य़ांमध्ये सुमारे ४० हजार लोकांनी मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे.

२ लष्करी हेलिकॉप्टर्स, एनडीआरएफच्या २० कंपन्या आणि पीएसीच्या (पूरविषयक) २९ कंपन्यांचे जवान यांच्यासह लष्कराचे जवान पुराचा तडाखा बसलेल्या भागात अडकलेले लोक आणि मालमत्ता यांचे रक्षण करण्याच्या कामात गुंतलेले आहेत. नेपाळमधून निघणाऱ्या नद्यांमध्ये सोडण्यात आलेले पाणी आणि मुसळधार पाऊस यामुळे बचावकार्य तसेच लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या कामात अडथळा येत आहे, असे प्रशासनाने सांगितले.