इंदूर :मध्य प्रदेशातील इंदूर येथे असलेल्या लता दीनानाथ मंगेशकर ग्रामोफोन रेकॉर्ड संग्रहालयात लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांच्या ७,६०० ग्रामोफोन ध्वनिमुद्रिका (रेकॉर्ड ) आहेत. इंदूर येथेच २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला होता.
सुमन चौरसिया यांनी २००८ मध्ये पिग्दाम्बर परिसरात १६०० चौरस फूट जागेत हे संग्रहालय उभारले असून तेथे हा अमूल्य ठेवा जतन केला आहे.
रविवारी लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजताच आपणास अतीव दु:ख झाले, असे चौरसिया म्हणाल्या. वसंत पंचमीच्या दुसऱ्या दिवशी लताजींचे आपल्यातून निघून जाणे हे माझ्यासारख्या त्यांच्या लक्षावधी चाहत्यांसाठी खूपच धक्कादायक आहे, असे त्यांनी सांगितले. लताजींशी माझी अखेरची भेट ही २०१९ मध्ये झाली. त्यानंतर करोना निर्बंध सुरू झाल्याने आम्ही पुन्हा भेटू शकलो नाही, अशी खंत त्यानी व्यक्त केली. १९६५ पासूनच आपण मंगेशकर यांच्या गीतांच्या ध्वनिमुद्रिका संग्रही बाळगणे सुरू केले. त्यांची संख्या आता ७,६०० वर पोहोचली आहे. लता मंगेशकर ३२हून अधिक भारतीय आणि परकीय भाषा- बोलींत गायल्या आहेत. त्यातील अनेक दुर्मीळ गाणी या संग्रहात आहेत. त्याशिवाय लता मंगेशकर यांची छायाचित्रे, त्यांच्याशी संबंधित पुस्तके यांचाही ठेवा येथे आहे.