उत्तर प्रदेशमधील बेकायदेशीर धर्मांतरामध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या आठ जणांवर भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने या सर्वांना अटक केली होती. एटीएसचा अर्ज स्वीकारत, लखनऊ न्यायालयाने अटक केलेल्या आठ जणांवर आयपीसी कलम १२१-ए (दंडनीय अपराध करण्यासाठी कट रचणे) आणि १२३ (युद्धाचा कट रचण्याच्या हेतूने माहिती लपवणे) अंतर्गत आरोप लावले आहेत.

या वर्षी २१ जून रोजी एटीएसने मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहागीर आलम कासमी या दोन मौलवींना दिल्लीतून अटक केली होती. यांच्या अटकेनंतर हजारो लोकांच्या धर्मांतरामध्ये यांचा सहभाग असून हे खूप मोठं रॅकेट असल्याचा दावा एटीएसने केला होता. त्यानंतर एजन्सीने आणखी आठ जणांना अटक करून आरोपींनी इस्लामिक दावा सेंटरच्या बॅनरखाली मोठ्या प्रमाणावर लोकांचे धर्मांतर केले होते, असा दावा केला होता. या आरोपींनी अपंग मुले, महिला, बेरोजगार आणि गरजूंना चांगले शिक्षण, लग्न, नोकरी आणि पैशाचं आमिष दाखवून धर्मांतर केल्याचंही म्हटलं होतं. अटक करण्यात आलेल्या १० जणांपैकी चार महाराष्ट्रातील, दोन दिल्ली आणि हरियाणा, तर  गुजरात, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

ज्या आठ जणांविरुद्ध आयपीसी कलम १२१-ए आणि १२३ लागू करण्यात आले आहेत, त्यामध्ये मोहम्मद उमर गौतम, मुफ्ती काझी जहागीर आलम कासमी, सलाहुद्दीन जैनुद्दीन शेख, इरफान शेख उर्फ इरफान खान, डॉ. फराज, प्रसाद रामेश्वर कावरे उर्फ अॅडम, भूप्रिया बंडो उर्फ अरसलन आणि कौसर आलम यांचा समावेश आहे.

एटीएसने दावा केला आहे की त्यांच्याकडे या आठही आरोपींविरोधात कलम १२१-ए आणि १२३ लावण्यासाठी पुरेसे पुरावे गोळा केले असून कोर्टात केस डायरीही सादर केली असल्याचा दावा एटीएसने केलाय. दरम्यान एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “पुरावे आणि केस डायरीची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने आठ आरोपींविरुद्ध आयपीसी कलम-१२१-ए आणि १२३ लागू करण्याची परवानगी दिली आहे.”