देशभरातील जवळपास ८० टक्के खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत तीन गावं दत्तक घेत त्यांचा विकास करण्याचं आवाहन केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत फक्त १९ टक्के खासदारांनीच या योजनेअंतर्गत तीन गावांची निवड केली आहे. ८८ टक्के खासदारांनी एका गावाला दत्तक घेतलं आहे, तर ५९ टक्के खासदारांनी दोन गावं दत्तक घेतली आहेत. रिपोर्टनुसार, आतापर्यंत १३१४ गावांची निवड करण्यात आली असून, तिथे ४२ टक्के काम पूर्ण झालं आहे. योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेला उशीर लक्षात घेता ग्रामविकास मंत्रालयाने राज्याचे मुख्यमंत्री आणि खासदारांना पत्र लिहून लवकरात लवकर गावांची निवड करा आणि पंतप्रधानांनी दिलेलं टार्गेट पूर्ण करा असं सांगितलं आहे.

योजना लागू करण्यात फक्त विरोधी पक्षाचे खासदारच मागे पडलेत असं नाहीये. भाजपाचे खासदारही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेत पिछाडीवर आहेत. १९१ भाजपा खासदारांनी आतापर्यंत तिस-या गावाची निवड केलेलीच नाही. तर ८४ खासदारांनी दुस-या गावाची निवड केलेली नाही. अशाप्रकारे राज्यसभेच्या फक्त १२ भाजपा खासदारांनी या योजनेअंतर्गत विकास करण्यासाठी तीन गावांची निवड केली आहे. २० खासदारांनी आतापर्यंत दुस-या गावाची निवड केलेली नाही. दरम्यान, भाजपाच्या खासदारांनी किमान एक गाव दत्तक घेतलेलं आहे. या योजनेसाठी खासदारांना कोणताही विशेष निधी देण्यात आलेला नाही. आपला राजकीय प्रभाव वापरत खासदार गावात योग्यप्रकारे योजना लागू करतील अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१४ रोजी आपल्या महत्वाकांक्षी खासदार आदर्श ग्रामयोजनेची सुरुवात केली होती. याअंतर्गत प्रत्येक खासदाराला २०१९ पर्यंत तीन गावांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. खासदारांना २०१६ चं टार्गेट देण्यात आलं होतं. खासदारांना पत्र लिहून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यास सांगण्यात येत आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्रालयाने दिली आहे. खासदारांनी मात्र बचाव करताना, एका गावाची निवड करताना दुस-या गावातील लोक नाराज होत असल्याने अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागत असल्याचं सांगितलं आहे.