गुरुग्राम : हरियाणाच्या नुह जिल्ह्यामध्ये तौरु या गावाजवळ एका धावत्या बसला आग लागून किमान नऊ जणांचा जळून मृत्यू झाला आणि अन्य १५ जण जखमी झाले. शनिवारी पहाटे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही बस शनिवारी पहाटे दोन वाजता कुंडली-मानेसर-पलवल (केएमपी) द्रुतगती मार्गावर धावत असताना तिला आग लागली. बसमध्ये जवळपास ६० प्रवासी मथुरा आणि वृंदावन येथून परत येत होते. ते सर्व जण एकमेकांचे नातेवाईक असून पंजाबमधील होशियारपूर आणि लुधियाना येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>> Swati Maliwal Case : “हा माझ्या मुलावर अन्याय आहे, तो गेली १५ वर्ष…”; बिभव कुमार यांच्या अटकेनंतर वडिलांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस निरीक्षक आणि सदर तौरुचे ठाणेदार जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, या अपघातात सहा महिला आणि तीन पुरुषांचा मृत्यू झाला. १५ जण जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. बसला आग लागण्याचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही, त्याचा तपास सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.

तौरुमधील एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर काही लोकांनी मोटारसायकलवरून बसचा पाठलाग केला आणि चालकाला बस थांबवण्यास सांगितले. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलालाही या आगीची माहिती दिली.