9 show cause notices issued to Air India in 6 months over Safety Violations : अहमदाबाद विमान अपघातापासून एअर इंडिया ही विमान कंपनी चर्चेत आहे. यादरम्यान केंद्र सरकारने आज संसंदेत मोठा खुलासा केला आहे. गेल्या सहा महिन्यात एअर इंडियाला सुरक्षा उल्लंघनांच्या ५ प्रकरणात ९ वेळा कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी राज्यसभेत दिली आहे. त्यांनी हेही सांगितले की, एका प्रकरणात कारवाई देखील पूर्ण झाली आहे. केंद्रीय मंत्री मोहोळ यांना १२ जून रोजी झालेल्या अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याला उत्तर देताना अपघातग्रस्त विमानाच्या विश्वसनियता रिपोर्टमध्ये कोणतीही छेडछाड आढळून आलेली नसल्याचेही स्पष्ट केले.
अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करत आहे. त्यांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे आणि या दुर्घटनेची सविस्तर चौकशी अद्याप बाकी आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळले होते. हे विमान एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले होते, ज्यामध्ये २४१ प्रवासी आणि काही जमिनीवरील लोकांचाही जीव गेला होता.
मोहोळ यांनी काय सांगितले?
उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्यसभेत म्हणाले की , सरकार विमानांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर आहे आणि नियमांचे पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. १२ जून रोजी अहमदाबाद येथे जो विमान अपघात झाला, ते बोइंग ७८७-७ विमान होते, जे लंडनला जात होते. विमानात २४२ प्रवासी होते, ज्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. एएआयबीने या अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, टेकऑफ झाल्यानंतर काही सेकंदातच विमानाच्या दोन्ही इंजिनांचे इंधन स्विच बंद झाले. ब्लॅक बॉक्समध्ये आढळलेल्या आवाजाच्या रेकॉर्डिंगनुसार एक पायलट दुसऱ्याला विचारले होते की त्याने फ्यूएल स्विट कटऑफ का केले. त्यावर दुसर्या पायलटने सांगितले की त्याने असे केलेले नाही.
केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहात सांगितले की, “विमान अपघात तपास ब्युरोच्या महासंचालकांनी विमान (अपघात आणि घटनांचा तपास) नियम २०१७ च्या नियम ११ नुसार १२,०६.२०२५ रोजी एअर इंडियाच्या विमान AI-१७१ च्या अपघाताची संभाव्य कारणे शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.” तसेच ते म्हणाले की एएआयबीने १२ जून २०२५ च्या अपघाताबाबत एक प्राथमिक अहवाल जारी केला आहे आणि तो त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच अपघाताच्या संभावित कारणांची माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत हे देखील सांगितले की गेल्या ६ महिन्यात दुर्घटनाग्रस्त विमानांच्या विश्वसनीयता अहवालात कोणताही फेरफार आढळून आलेला नाही. या दुर्घटनेचा तपास सुरू आहे आणि लवकरच एएआयबी त्यांचा अंतिम अहवाल सादर करेल. केंद्र सरकार हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.