अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याने १९९३ मध्येच अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करण्याची तयारी चालवली होती. मात्र, पुरेशी आर्थिक रसद उपलब्ध होऊ न शकल्याने त्याचा हा कट उधळला गेला. त्यावेळी एफबीआयच्या हस्तकाचा लादेनशी थेट संपर्क आला होता, अशी खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.
एफबीआयच्या लॉस एंजेलिस येथील कार्यालयातील प्रतिनिधी बासेम युसुफ याने एफबीआयविरोधात रोजगाराशी संबंधित याचिका दाखल केली आहे. युसुफचा सहकारी एडवर्ड कुरान याने युसुफची बाजू मांडताना वरील खळबळजनक माहिती न्यायालयाला दिली होती. परंतु २०१० मध्ये झालेल्या या कबुलीजबाबाची सार्वजनिकरीत्या कुठेही वाच्यता करण्यात आली नव्हती. १९९३ मध्ये युसुफने अल-कायदाच्या एका हस्तकाशी संपर्क साधला होता व त्याच्या माध्यमातून बिन लादेनशी संपर्क झाला होता, असे कुरान याने न्यायालयाला सांगितले. हस्तकाकरवी मिळालेल्या माहितीतून लादेन लॉस एंजेलिसमधील मोझ्ॉनिक लॉज या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखत होता व त्यासाठी त्याला आर्थिक रसदीची आवश्यकता होती. मात्र, आर्थिक रसद मिळू न शकल्याने त्याची ही हल्ल्याची योजना सफल होऊ शकली नाही, असे कुरान याने न्यायालयात सांगितले.
कुरानच्या या कबुलीजबाबावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. या संपूर्ण कबुलीजबाबाचा वृत्तांत वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने प्रसिद्ध केला आहे. आतापर्यंत ही माहिती का दडवण्यात आली, तसेच एफबीआय व सीआयए ओसामाच्या मागावर असतानाही ही माहिती उघड का करण्यात आली नाही, अमेरिकेवरील ११ सप्टेंबरच्या दहशवादी हल्ल्याच्या तपासातील कोणत्याही टप्प्यावर ही माहिती का पुढे आली नाही, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान ही माहिती दडवून ठेवण्याच्या मुद्दय़ावरही आश्चर्य व्यक्त होत आहे.