केवळ ११ लोकसभा मतदारसंघ असलेल्या छत्तीसगडमधील जय-पराजयाने लोकसभेचे चित्र बदलेल, अशी शक्यता नाही. असे असले तरी प्रतीकात्मक दृष्टय़ा या राज्यातील  विजय भाजप आणि काँग्रेस या दोघांसाठी महत्त्वाचा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आदिवासीबहुल असलेले हे राज्य नक्षलवाद प्रभावितही आहे. येथे विजय मिळविणे, म्हणजे देशाच्या विकासवाटेवर सर्वात मागच्या रांगेत असलेल्या जनतेला आपलेसे वाटणे, अशी काहीशी धारणा आहे. त्यामुळेच राज्यात प्रभावी असलेले हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष या ११ जागांवर हिरिरीने मैदानात उतरले आहेत.

मतदानाचे वेळापत्रक

राज्याचा बराचसा भाग डोंगराळ, जंगलांचा असल्याने आणि मुख्यत: बस्तरसारख्या जिल्ह्यांत नक्षलवाद्यांचा उपद्रव असल्याने केवळ ११ जागा असूनही छत्तीसगडमध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. बस्तरमध्ये पहिल्या टप्प्यात १९ तारखेला मतदान होईल. २६ एप्रिलच्या दुसऱ्या टप्प्यात राजनांदगाव, महासमुंद आणि कांकेर येथे, तर ७ मे रोजी राज्यातील अखेरच्या टप्प्यात रायगड, जांगिर-चंपा, कोरबा, बिलासपूर, दुर्ग, रायपूर आणि सरगुजा या सात मतदारसंघांत मतदान होईल.

shalini patil vishal patil
शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांचे कान टोचले, अपक्ष लढण्याच्या चर्चेवर म्हणाल्या, “घरातल्या कार्यालयात बसून…”
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा >>>“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत

छत्तीसगडमध्ये केवळ दोन राष्ट्रीय पक्षांचाच प्रभाव आहे. स्थानिक पक्ष फारसे प्रबळ नसल्यामुळे या दोन ‘हत्तीं’मध्ये थेट टक्कर अनुभवायला जाते. पक्षाला स्वबळावर ३७० आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४००पेक्षा जास्त जागांचे उद्दिष्ट भाजपने यावेळी ठेवले आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा असल्याने केवळ ११ जागा असल्या, तरी छत्तीसगडमध्ये सत्ताधारी भाजप आपली सर्व ताकद पणाला  लावताना दिसत आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये या राज्याने भाजपला भरभरून साथ दिली. पहिल्या मोदी लाटेमध्ये पक्षाने ११पैकी १० जागा जिंकल्या, तर मागच्या निवडणुकीत भाजपला केवळ एक जागा गमवावी लागली. पुन्हा एकदा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा उद्देशाने भाजपने काही मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांना डच्चू देत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर गत वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस आतूर आहे. कुणाच्याही ध्यानी-मनी नसताना भाजपने भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला विधानसभेच्या सत्तेतून खाली खेचले. ९० जागांपैकी ५४ जागा जिंकून (३९ने वाढ) भाजपने निर्विवाद बहुमत प्रस्थापित केले आणि काँग्रेसला ३३ जागांच्या नुकसानासह ३५ जागांवर समाधान मानावे लागले. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेस इच्छुक आहे. 

राजनांदगावकडे लक्ष

राजनांदगाव ही छत्तीसगडची सांस्कृतिक राजधानी आहे. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक क्रांतिकारी या जिल्ह्याने दिले आहेत. आशियातील पहिले आणि एकमेव संगीत विश्वविद्यालय याच जिल्ह्यातील खैरागडमध्ये आहे. गणेशोत्सव अत्यंत धूमधडाक्यात साजरा करणाऱ्या राजनांदगावने क्रीडासंस्कृतीही जपली आहे. अशा या बहुआयामी मतदारसंघात काँग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मैदानात उतरविले आहे. भाजपने विद्यमान खासदार संतोष पांडेय यांना पुन्हा संधी दिली आहे. १९९९नंतर २००७च्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळला, तर काँग्रेसला हा मतदारसंघ एकदाही जिंकता आलेला नाही. असे असले, तरी विधानसभा निवडणुकीचा निकाल बघता काँग्रेसचे पारडे जड आहे. आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकणी गतवर्षी काँग्रेसने विजय मिळविला आहे.

हिंदी भाषिक राज्ये (काऊ बेल्ट) ही गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली दिसतात. छत्तीसगड त्याला अपवाद नाही. भाजप आपली विजयाची परंपरा कायम राखून जागांची बेरीज करणार की काँग्रेस सत्ताधाऱ्यांना छोटासा धक्का देऊन देशाच्या आकडेवारीतून भाजपच्या मतदारसंघांची वजाबाकी करणार, हे ४ जून रोजी निकालात स्पष्ट होईल.

हेही वाचा >>>“भारताची आण्विक शस्त्रास्रे नष्ट करण्याचा कट”, पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर आरोप

गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये छत्तीसगड हे छोटे राज्य भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा धक्का दिल्यानंतर ही पक्षाची दुसरी अग्निपरीक्षा आहे.

बहुभाषिक प्रचार हे वैशिष्टय़

साधारणत: मुंबई-दिल्लीसारख्या महानगरांमध्ये अन्य राज्यांतून आलेले मतदार मोठय़ा प्रमाणात असतात. त्यामुळे या शहरांमध्ये बहुभाषिक प्रचारयंत्रणा राबविली जाते. मात्र छत्तीसगड हे असे राज्य आहे, जेथे एकाच मतदारसंघात विविध भाषांमध्ये प्रचार केला जातो. जमीनबंद (लँडलॉक) छत्तीसगडच्या सीमा सात राज्यांशी जोडलेल्या आहेत. या सीमावर्ती भागांमध्ये शेजारच्या राज्यातील भाषांचा प्रभाव दिसतो. राजनांदगाव महाराष्ट्राच्या सीमेवर असून तेथील काही गावांमध्ये मराठीभाषक मोठय़ा संख्येने आहेत. तर सरगुजामध्ये भोजपुरी आणि झारखंडी भाषेत प्रचार करावा लागतो. अशाच पद्धतीने उडिया, तेलगू या भाषा बोलणारे मतदारही त्या त्या राज्यांच्या सीमांवर आढळतात. शिवाय आदिवासीबहुल जिल्हा असल्याने गोंडी, हल्बी, कुडुक, सरगुजिहा, छत्तीसगढी या स्थानिक भाषाही प्रचारासाठी वापराव्या लागतात.

११ एकूण जागा

२०१४ चे बलाबल

भाजप १०

काँग्रेस १

२०१९ चे बलाबल

भाजप ९

काँग्रेस २