Delhi Court : दिल्लीत एक धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पैसे उकळण्यासाठी बलात्काराचा खोटा खटला दाखल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने संबंधित महिलेवर कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने महत्वाचं निरीक्षण देखील नोंदवलं आहे.
या प्रकरणातील आरोपीची न्यायालायने निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयाने नमूद केलं की, ‘आरोपीची संबंधित महिलेबरोबर भेट ही एका वैवाहिक वेबसाइटच्या माध्यमातून झाली होती. तिने वैवाहिक संबंधाच्या बहाण्याने आरोपीला फसवल्याचं आता सिद्ध झालं आहे’, असं म्हणत यावेळी न्यायालयाने काही घटनांचा संदर्भ देत संबंधित महिलेविरुद्ध तक्रार नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच न्यायालयाने म्हटलं की, ‘या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता हे न्यायाच्या हिताचं ठरणार नाही. कारण कायद्याने केवळ दोषींना शिक्षाच नाही तर निर्दोष व्यक्तीच्या प्रतिष्ठेचं रक्षण देखील केलं पाहिजे. या खटल्यातील निकाल आरोपीच्या बाजूने असला तरी समाज आरोप लक्षात ठेवतो, निकाल नाही’, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त Live Law ने दिलं आहे.
तसेच खोट्या बलात्काराच्या आरोपांमुळे बलात्काराच्या घटनेतील पीडितांवरही गंभीर अन्याय होत असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. या प्रकरणाच्या संपूर्ण सुनावणी दरम्यान न्यायालयाचा मौल्यवान वेळ आणि संसाधनांचा अपव्यय झाल्याचं मतही न्यायालयाने व्यक्त केलं. या प्रकरणात खोटी साक्ष दिल्याच्या गुन्ह्यासाठी फिर्यादी महिलेवर तक्रार दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
फिर्यादी महिलेचा आरोप काय होता?
दरम्यान, फिर्यादी महिलेने आरोप केला होता की आरोपीने तिच्याशी एका वैवाहिक वेबसाइटवरील प्रोफाइलद्वारे चॅटिंग सुरू केली. त्यानंतर जेव्हा तो तिला त्याच्या कारमध्ये पहिल्यांदा भेटला, तेव्हा त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिचे नग्न फोटो काढले. यासाठी तिने आरोपीला विरोध केला तेव्हा आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर त्याने पुढच्या भेटीवेळी तिचे फोटो डिलीट करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, आरोपीने त्यानंतरही तिच्यावर अत्याचार केला, असे आरोप महिलेने केले होते.
आरोपीची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने काय म्हटलं?
आरोपीला निर्दोष सोडताना न्यायाधीशांनी म्हटलं की, “पीडितेची साक्ष योग्य नव्हती, तिने बलात्कार किंवा छेडछाडीची खोटी कहाणी रचून न्यायालयासमोर खोटा जबाब दिला. त्यामुळे या परिस्थितींचा संपूर्ण विचार केला तर फक्त एकच निष्कर्ष निघतो की, या खटल्यात पीडितेने लग्नाच्या बहाण्याने आरोपीला पूर्वनियोजित पद्धतीने अडकवलं, कारण त्याच्याकडून पैसे उकळता यावेत.”