भारत सरकारने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान कमालीचा चिडलेला आहे. या मुद्यावरूनच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांकडून रोज भारत विरोधी नवनवीन विधानं केली जात आहेत. काश्मीरसाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो असे म्हणत दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान इम्रान खान यांनी आण्विक युद्धाची भाषा केल्यानंतर आता, पाकिस्तान सराकरचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी आगामी दोन महिन्यात भारताबरोबर थेट युद्ध होणार असल्याचेच भाकीत केले आहे.

पाकिस्तान आणि भारतादरम्यान संपूर्ण ताकदीनिशी युद्ध होणार असून ते ऑक्टोबर किंवा त्यानंतरच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे, असे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी बुधवारी भाकीत वर्तवले आहे. ‘पाकिस्तान टुडे’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

आपल्या मुळगावी रावळपिंडी येथे एका कार्यक्रमात बोलताना रशीद यांनी स्पष्ट केले की, “काश्मीरमधील स्वातंत्र्यलढ्याची आता अंतिम वेळ आली आहे आणि यावेळचं भारताबरोबरचं युद्ध हे शेवटचं असणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला (यूएनएससी) खरोखरच हा प्रश्न सोडवायचा असला असता तर, त्यांनी काश्मीरबाबत एखादा अभिप्राय नोंदवला असता. आपण काश्मीर खोऱ्यातील लोकांच्या पाठीशी उभा राहायला हवं आणि मोहरम नंतर मी पुन्हा एकादा काश्मीरला भेट देईल” असेही ते म्हणाले . तसेच, काश्मीर सध्या विनाशाच्या तोंडावर आहे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत आहेत असा आरोप त्यांनी केला . त्यांच्या समोर पाकिस्तान हा एकमेव अडसर आहे. बाकीचे मुस्लिम जग या विषयावर गप्प का? असा प्रश्नही रशीद यांनी यावेळी उपस्थित केला.

तसचे, जिन्ना यांनी फार पूर्वी भारताची मुस्लिमविरोधी मानसिकता ओळखली होती. मात्र जे अजूनही भारताशी संवाद साधण्याच्या शक्यतेबद्दल विचार करतात ते मूर्ख आहेत. संयुक्त राष्ट्रात आगामी २७ सप्टेंबर रोजी होणारे पंतप्रधान इम्रान खान यांचे भाषण महत्त्वपूर्ण असणार असल्याचे सांगत, आपण भाग्यवान आहोत की चीन सारखा मित्र आपल्या बरोबर उभा आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

काही दिवसांपूर्वीच शेख रशीद यांच्यावर लंडनमध्ये हल्ला झाला होता. त्यांच्यावर अंडे फेकण्यात आले होते. रशीद शेख यांनी भारत – पाकिस्तानमध्ये आण्विक युद्ध होईल असे म्हटले होते. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी हे देखील म्हटले होते की जर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला केला तर भारतीय उपखंडातील ते सर्वात मोठं युद्ध असेल आणि त्यामुळे याचा संपूर्ण नकाशा बदललेला असेल.