भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर गेल्या १८ दिवसांपासून उपचार सुरु आहेत. शनिवारी ८ जानेवारी रोजी त्यांना करोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याने मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशभरामधून प्रार्थना केल्या जात आहेत. असं असतानाच अयोध्येमध्ये महामृत्यूंजय मंत्राचा जप करण्यात आला.

९२ वर्षीय लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी अयोध्येमधील आचार्य पीठाच्या तपस्वी छावणीमध्ये राजसूय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. महायज्ञ तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. लता मंगेशकर यांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी महामृत्युंजय आणि संकटमोचन हनुमानाच्या मंत्रांचा जप करम्यात आला. तसेच वेदमंत्रांच्या उच्चारांसहीत यज्ञशिलेमध्ये आहुती समर्पित करण्यात आली.

जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी यासंदर्भात प्रतिक्रियाही दिली. “गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्हा महामृत्युंजय यज्ञ केला. मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की त्यांनी लता मंगेशकर यांची भेट घ्यावी,” असं जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. ‘लतादीदींच्या प्रकृतीत कालपासून सुधारणा होत आहे. मात्र तरीही त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्या लवकरात लवकर ठिक व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा’, असं डॉक्टर समदानी म्हणाले होते.