बायकोशी भांडण झाल्याने फेसबुक लाइव्ह करत पतीची आत्महत्या

पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत

बायकोशी भांडण झाल्याच्या रागात एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करताना पतीने फेसबुकवर लाइव्ह केलं होतं. गुरुग्राममधील पतौडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून, आत्महत्येमागे दुसरं कोणतं कारण होतं का याचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सात वाजता पतीने फेसबुक लाइव्ह करत गळफास घेतला. पत्नीशी भांडण झाल्याच्या रागातच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे कुटुंबियांनी घटनेसंबंधी पोलिसांना कळवलं नाही. पोलिसांशी संपर्क न साधताच त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून त्यांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे.

अशीच एक घटना नुकतीच समोर आली होती ज्यामध्ये पत्नी आत्महत्या करत असताना पती व्हिडीओ शूटींग करत होता. मथुरामध्ये हुंड्यासाठी छळ होत असल्याने एका महिलेने आत्महत्या केली. फाशी लावून घेत तिने आत्महत्या केली. यातील धक्कादायक आणि माणूसकीला काळीमा फासणारी गोष्ट म्हणजे आपली पत्नी फाशी लावून घेत असताना तिच्या पतीने तिला रोखण्याऐवजी तो तिचे व्हिडियो शूटींग करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुद्ध विहार कॉलनीमध्ये हे जोडपे राहत होते आणि रात्रीच्या वेळी या महिलेने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस महिलेच्या नातेवाईकांसोबत याठिकाणी हजर झाले. पोलिसांनी आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीला आणि सासूला हुंड्यासाठी त्रास दिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: A man commits suicide facebook live after fight with wife