केरळमध्ये एका व्यक्तीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मुका घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील आपला मतदारसंघ वायनाडच्या दौऱ्यावर असून यावेळी एका व्यक्तीने हात मिळवताना अचानक राहुल गांधी यांचा मुका घेतला. या अनपेक्षित प्रकारामुळे राहुल गांधी यांना थोडं अवघडल्यासारखं वाटलं. हा प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे. व्हिडीओत राहुल गांधी कारमध्ये बसलेले असून लोकांच्या शुभेच्छा स्विकारताना दिसत आहे. यावेळी निळा शर्ट घातलेली एक व्यक्ती राहुल गांधींशी हात मिळवत असल्याचं दिसत आहे. यानंतर काही वेळाने अचानक ही व्यक्ती राहुल गांधींच्या जवळ जाऊन मुका घेताना व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

यावेळी सुरक्षारक्षक या व्यक्तीला मागे खेचतात. या घडलेल्या प्रकारानंतरही राहुल गांधी शांतपणे कारभोवती जमा झालेल्या लोकांच्या शुभेच्छा स्विकारताना दिसत आहेत.

आपल्या मतदारसंघातील मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी सध्या आपल्या मतदारसंघात आहेत. पावसाळ्यात वायनाडमध्ये अनेक ठिकाणी लँडस्लाइड झालं असून राहुल गांधी मदतकार्य तसंच पुनर्वसन कार्याचा आढावा घेत आहेत.

राहुल गांधी यांच्यासोबत आधीही अशी एक घटना घडली होती. गुजरातमध्ये एका महिलेने राहुल गांधी यांचा मुका घेतला होता. त्यावेळी ते लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करत होते. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला ही घटना घडली होती. तर २०१४ मध्ये पश्चिम बंगालमध्ये एक व्यक्तीने राहुल गांधींचा मुका घेतला होता. रॅली संपल्यानंतर एका मिठाईच्या दुकानात गेले असता हा प्रकार घडला होता.