तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या सभेत गदारोळ झाला. सध्या, आसामचे मुख्यमंत्री सध्या तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. आज (शुक्रवार) ते हैदराबादच्या बेगम बाजार परिसरात एका जाहीर सभेला संबोधित करत होते. सभेदरम्यान एक व्यक्ती अचानक मंचावर चढली आणि जबरदस्तीने माईक हिसकावून घेतला. शिवाय मुख्यमंत्र्यांसमोर माईक फोडण्याचाही प्रयत्नही केला. गोंधळानंतर संबंधित व्यक्तीला मंचावरून खाली आणण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती तेलंगणातील सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्रीय समितीची आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा रंगीत दुपट्टा परिधान केलेल्या या व्यक्तीला तत्काळ पकडण्यात आले आणि मंचावरून खाली उतरवण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती. वास्तविक गणेश उत्सव आणि इतर कार्यक्रमांसाठी भाग्यनगर गणेश उत्सव समितीचे पाहुणे म्हणून मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हैदराबादला पोहोचले आहेत.

हिमंता बिस्वा शर्मा हे जाहीर सभेपूर्वी महालक्ष्मी मंदिरात पोहोचले होते. जिथे ते म्हणाले की, ”सरकार हे देशासाठी, देशातील जनतेसाठी असले पाहिजे. सरकार कधीही कुटुंबासाठी नसावे. देशात उदारमतवाद आणि कट्टरतावाद आहे आणि या दोघांमध्ये देशात नेहमीच ध्रुवीकरण झाले आहे.”

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर हल्ला करताना आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, “मुख्यमंत्री केसीआर भाजपमुक्त राजकारणाची चर्चा करतात, पण आम्ही घराणेशाहीमुक्त राजकारणाची चर्चा करतो. हैदराबादमध्ये त्यांच्या मुलाची आणि मुलीची छायाचित्रे आम्हाला अजूनही दिसतात. देशाचे राजकारण घराणेशाहीपासून मुक्त असले पाहिजे.”