फाशीच्या शिक्षेची तरतूद रद्द करण्यास माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे त्यांना टोकाचा गुन्हा करण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विषमता प्रवृत्त करते असे राष्ट्रपतिपदावर असताना बहुसंख्य प्रकरणांत आपल्या निदर्शनास आले. त्या वेळी निर्णय घेताना आपल्याला वेदना झाल्या, असेही कलाम यांनी म्हटले आहे.
फाशीच्या शिक्षेबाबत विधि आयोगाने मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेच्या वेळी कलाम यांच्यासह काही जणांनी ही तरतूद रद्द करण्यास पािठबा दर्शविला. मात्र ४०० हून अधिक प्रतिवादींनी फाशीची तरतूद कायम ठेवण्यास पाठिंबा दिला.
राष्ट्रपती असताना फाशीची शिक्षा हे आपल्यापुढील अत्यंत कठीण काम होते. न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर निर्णय घेणे कठीण होते, कारण बहुसंख्य प्रकरणे सामाजिक आणि आर्थिक विषमतेशी निगडित होती, असेही माजी राष्ट्रपती म्हणाले. ज्या व्यक्तीचे वैमनस्य नसते आणि गुन्हा करण्याचा त्याचा हेतू नसतो, अशा व्यक्तीला आपण शिक्षा देत आहोत, अशी त्या वेळी आपली धारणा होत होती, असेही कलाम म्हणाले.
तथापि, एका प्रकरणात उदवाहन चालकाने मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली होती. त्या प्रकरणात मात्र आपण त्याची फाशीची शिक्षा कायम केली, असेही माजी राष्ट्रपतींनी सांगितले. विधि आयोगाने फाशीच्या शिक्षेबाबत आयोजित केलेल्या चर्चासत्राचा शनिवारी समारोप झाला. पुढील महिन्यात सर्वोच्च न्यायालयात अंतिम अहवाल सादर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A p j abdul kalam favours abolition of death penalty
First published on: 10-07-2015 at 12:36 IST