ठाकरे गटाचे युवानेता आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज मथुरा दौऱ्यावर आहेत. तिथं त्यांनी श्यामा श्याम या मंदिराचे उद्घाटन केले. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलेल्या निमंत्रणावरून आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि ठाकरे कुटुंबातील इतर सदस्य मथुरेत दाखल झाले. ठाकरे गट मथुरेत गेल्याने भाजपानेही त्यांच्यावर टीका केली. या टीकेवर आदित्य ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी मथुरेतील बाँके बिहारी मंदिरात पूजा करून दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आज कार्तिक पौर्णिमा आहे. येथे हा दिवस शुभ मानला जातो. येथे येऊन दर्शन घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी आम्हाला येथे बोलावलं. मी, माझी आई, मावशी आणि शिवसेना परिवार येथे आहे.
हेही वाचा >> “खोके सरकारने गद्दारांच्या ४० मतदारसंघांमध्ये…”, आदित्य ठाकरेंचा खेडमधून राज्य सरकारवर हल्लाबोल
देवाकडे महाराष्ट्रासाठी काय साकडं घातलं? असा प्रश्न माध्यमांनी आदित्य ठाकरेंना विचारला. त्यावर ते म्हणाले की, देवाच्या येथे नमस्कार करायचा असतो. आपल्या मनातलं आणि हृदयातलं देवाला माहित असतं.
यावेळी भाजपाने केलेल्या टीकेवरही आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “स्वतःला हिंदुत्त्वावादी म्हणणवारा पक्ष कोणी दर्शनाला गेलं की टीका करतो ही हास्यास्पद बाब आहे. दर्शनासाठी कुणी जात असताना टीका करणं, घोषणाबाजी करणं हा बालिशपणा आहे”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.