केरळच्या कन्नूर लोकसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर अनपेक्षित पाहुणा आल्याने मतदान प्रक्रिया बरचवेळ खोळंबली होती. देशात आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यात देशभरात एकूण ११६ जागांसाठी मतकौल दिला जाणार आहे. कन्नूर मतदारसंघातील मय्यील कंडाक्काई मतदान केंद्रावरील एका व्हीव्हीपॅट मशीनच्या आतमध्ये छोटा साप आढळला.

मतदान यंत्रात साप दिसताच मतदान केंद्रावर एकच गोंधळ निर्माण झाला. निवडणूक अधिकारी मतदारांमध्ये भिती पसरली. थोड़यावेळाने या सापाला बाहेर काढण्यात आले व मतदान सुरु झाले. कन्नूरमध्ये मोठया प्रमाणावर नागरिक आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत.

थिरुअनंतपुरमपासून ५२० किमी अंतरावर असलेला कन्नूर भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर जंगल परिसर असल्यानेच इथल्या कंडकई मतदान केंद्रावर साप निघाला असावा, असे सुत्रांकडून कळते. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले तरी मतदानावर त्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही.

दरम्यान, कन्नूर मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३८.८१ टक्के मतदान झाले. या जागेवर एकूण १३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. काँग्रेस, भाजपा, एलडीएफ, माकपा या प्रमुख पक्षांसह अनेक अपक्ष उमेदवारही इथून निवडणूक लढवत आहेत.