पीटीआय, लखनौ
कुख्यात गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम ऊर्फ अशरफ यांची ते पोलिसांच्या ताब्यात असताना शनिवारी रात्री भररस्त्यात तीन जणांनी गोळय़ा झाडून हत्या केल्याप्रकरणी चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने रविवारी तीन सदस्यीय न्यायिक आयोगाची नियुक्ती केली.
या न्यायिक आयोगाच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरिवद कुमार त्रिपाठी, तर सदस्यपदी निवृत्त न्यायाधीश ब्रिजेशकुमार सोनी आणि माजी पोलीस महासंचालक सुबेश कुमार सिंह यांची नेमणूक झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी येथे दिली.या चौकशी आयोगाने आपला अहवाल सरकारला दोन महिन्यांत द्यायचा आहे. राज्याच्या गृह विभागाने चौकशी आयोग कायदा, १९५२ अंतर्गत हा आयोग स्थापन केला आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात पोलिसांकडून दक्षता
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्यभरात सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. प्रयागराजमध्ये ज्या भागात अतिक अहमद याचे निवासस्थान आहे, त्या भागात गस्त वाढविण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
प्रयागराजचे पोलीस आयुक्त रमित शर्मा यांनी शनिवारी सांगितले होते की, अतिक अहमद आणि अशरफ यांना कायद्यातील अनिवार्य तरतुदीनुसार वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले होते. प्राथमिक माहितीनुसार, वार्ताहर असल्याचा बनाव केलेल्या तीन जणांनी या दोघांवर जवळून गोळय़ा झाडल्या. यात दोघांचाही मृत्यू झाला.
तीन हल्लेखोरांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. लवलेश तिवारी (२२, रा. बांदा), मोहित ऊर्फ सनी (२३, रा. हमीरपूर) आणि अरुण मौर्य (१८, कासगंज) अशी हल्लेखोरांची नावे असल्याची माहिती धूमनगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश कुमार मौर्य यांनी दिली.
दोन आठवडय़ांपूर्वी अतिककडून सर्वोच्च न्यायालयात संरक्षणाची मागणी
नवी दिल्ली : शनिवारी हल्लेखोरांच्या गोळीबारात ठार झालेला गुंड अतिक अहमद याने उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत असताना आपल्या जिविताचे संरक्षण व्हावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती, पण न्यायालयाने ती २८ मार्च रोजी फेटाळली होती. उत्तर प्रदेश राज्याची यंत्रणा अतिकच्या जिविताचे रक्षण करील, असे न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयात न्या. अजय रस्तोगी आणि न्या. बेला त्रिवेदी यांच्या पीठापुढे अतिकची याचिका सुनावणीसाठी आली होती. उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात असताना आपल्या जिविताला धोका आहे, असे अतिकने म्हटले होते. त्यावर, अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा या पीठाने त्याला दिली होती.
‘आयएसआय’शी संबंधांचा आरोप
प्रयागराज : रविवारी तिघांनी केलेल्या गोळीबारात ठार झालेला गुंड अतिक अहमद याने त्याआधी झालेल्या चौकशीत आपले पाकिस्तानच्या इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि दहशतवादी संघटना लष्कर- ए- तैयबाशी संबंध असल्याची कबुली दिली होती, असे त्याच्याविरोधात शाहगंज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची चौकशी करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा -कमलनाथ
भोपाळ : उत्तर प्रदेशात गुंड अतिक अहमद आणि त्याच्या भावाची पोलिसांच्या ताब्यात असताना हत्या झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी मध्य प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी रविवारी केली. उत्तर प्रदेश आणि देश कुठे जात आहे, याचा समाजाने विचार करावा. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन चौकशीचे आदेश द्यावेत, असे ते म्हणाले.
पुलवामा आरोपांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न – मुफ्ती
जम्मू : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबाबत जी तथ्ये समोर आणली, त्यावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठीच उत्तर प्रदेशात अतिक अहमद आणि त्याच्या भावाची गुंडांकडून हत्या करण्यात आली, असा आरोप पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी केला.