अलीगड : हाताने तयार करण्यात येणाऱ्या कुलपांसाठी प्रसिद्ध असलेल्या अलीगडमधील एका वयोवृद्ध कलाकाराने अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी ४०० किलोग्रॅम वजनाचे कुलूप तयार केले आहे. हे मंदिर पुढील वर्षी जानेवारीत भाविकांसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे.श्रीराम मंदिराचा विचार करून शर्मा यांनी तयार केलेले कुलूप १० फूट उंच, साडेचार फूट रुंद आणि ९.५ इंच जाड असून, त्याला ४ फूट लांब किल्ली आहे.

हे कुलूप तयार करण्यासाठी त्यांना सुमारे दोन लाख रुपये खर्च आला आणि आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी जन्मभराची मिळकत त्यासाठी लावली.‘जगातील सर्वात मोठे हस्तनिर्मित कुलूप’ तयार करण्यासाठी भगवान श्रीरामांचे निस्सीम भक्त असलेले सत्यप्रकाश शर्मा यांनी अनेक महिने परिश्रम घेतले. या वर्षीच हे कुलूप भेट म्हणून राम मंदिराच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा त्यांचा मनोदय आहे.हे कुलूप कुठे वापरले जाऊ शकते हे आम्हाला पाहावे लागेल, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.