फईझउद्दीन लष्कर या पेशानं शिक्षक असलेल्या विकृत मनोवृत्तीच्या माणसाविरोधात आसाममध्ये लोकांचा संताप चांगलाच वाढतो आहे, तसंच त्याच्या अटकेचीही मागणी पुढे येते आहे. आसामच्या हैलाकांडी जिल्ह्यातील काटलीचेरा गावात या विकृत शिक्षकानं एका शाळकरी मुलीसोबत अश्लील फोटो काढले आणि ते ऑनलाईन पोस्टही केले आहेत. हे फोटो चांगलेच व्हायरल झाल्यानंतर युनिव्हर्सल टीम फॉर सोशल अॅक्शन अँड हेल्प (उत्साह) या एनजीओनं याविरोधात आवाज उठवला आहे.
उत्साह ही एनजीओ विद्यार्थ्यांसाठी काम करते, तसंच शाळकरी मुलांचे हक्क त्यांना कसे मिळतील हे पाहणं या संस्थेचं मुख्य काम आहे. या शिक्षकाच्या विरोधात पोस्को कायद्या अंतर्गत कारवाई करून त्याला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
या शिक्षकानं एका शाळकरी मुलीसोबत काही आक्षेपार्ह फोटो काढले आणि त्यात मुलीचा चेहरा धुसर न करता ते फेसबुक आणि इतर सोशल वेबसाईट्सवर अपलोड केले. यानंतर या मुलीच्या आई आणि वडिलांनी लष्कर विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. तसंच या शिक्षक म्हणवणाऱ्या विकृताविरोधात कारवाईचीही मागणी केली आहे.
फईझउद्दीन लष्कर हा काटलीचेरा गावात असलेल्या मॉडेल हायस्कूलमध्ये शिक्षक आहे. याच्याविरोधात विद्यार्थिनींची छेडछाड केल्याच्या तक्रारी याआधीही नोंदवण्यात आल्या आहेत. तरीही तो त्याचे अश्लील चाळे आणि वर्तन सोडत नाहीये असंच दिसून येतं आहे. याआधी एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी लष्करला लोकांनी रस्त्यात मारहाणही केली आहे. तसंच त्याचं एक बोटही लोकांनी कापलं आहे तरीही हा विकृत फईझउद्दीन त्याचे चाळे सोडत नसल्याचं समोर आलं आहे, अशी बातमी काटलीचेरा गावातल्या स्थानिक चॅनेलनं दिली आहे. आता तेथील पोलीस आणि शाळा प्रशासन या शिक्षकाविरोधात कारवाई करण्यासाठी कसली वाट बघत आहेत असाही प्रश्न विचारला जातो आहे.
फईझउद्दीन लष्कर या विकृताविरोधात कठोर कारवाई झाली नाही तर ज्या मुलीसोबत हा प्रसंग घडला आहे तिचं मनोधैर्य खचेल असं उत्साह या एनजीओनं म्हटलं आहे. उत्साह या संस्थेनं त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरही या शिक्षकाचा फोटो टाकला आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. देशात मुली आणि महिलांची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा मनोवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल त्यामुळेच या विकृत शिक्षकावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी होते आहे.