आंध्रप्रदेशातील एका गावाने आपल्या गावाला हिंदू गाव म्हणून घोषित केलं आहे. इतकंच नाही तर या गावात इतर धर्मातील लोकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यासाठी गावाबाहेर एक बोर्ड लावण्यात आला आहे, ज्यावर दुसऱ्या धर्मातील लोकांनी गावात प्रवेश करु नये अशी चेतावणीच देण्यात आली आहे. हे आंध्रप्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील केसलिंगयपल्ली गाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या गावात २५० कुटुंब गावात राहतात, आणि सर्व हिंदू आहेत. यामुळेच सर्वसंमतीने हे गाव हिंदू गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर गावाता जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. गावाबाहेर एक बोर्ड लावण्यात आला आहे, ज्यावर लिहिण्यात आलं आहे की, ‘या गावात सर्व हिंदू लोक आहेत, यामुळे दुसऱ्या धर्मातील लोक इथे येऊन प्रचार करु शकत नाहीत. जर कोणी या नियमाचं उल्लंघन करताना आढळलं तर त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल’. या बोर्डच्या शेवटी असंही लिहिण्यात आलं आहे की, ‘जर कोणी आपला धर्म बदलला तर ते आपली आई बदलल्यासारखं असेल’.

या गावात दुसऱ्या धर्मातील लोकांना दोन वर्षांपुर्वीच २०१६ मध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे, मात्र सध्या हे गाव सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, गेल्या काही वर्षात ख्रिश्चन लोक आमच्या गावात येऊन पैसे आणि औषधं देण्याच्या बहाण्याने धर्मातर करण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही हिंदू असं कधीही करत नाही. ते लोक आमच्या लोकांचं ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच आम्ही दुसऱ्या धर्मातील लोकांना गावात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पष्टीकरण देताना गावकऱ्यांना दुसऱ्या धर्मातील लोकांना प्रवेश आहे, मात्र ते प्रचार करु शकत नाहीत असं म्हटलं आहे. हा निर्णय आरएसएस, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या सांगण्यावरुन घेण्यात आला नसल्याचंही त्याने सांगितलं आहे.

विशेष म्हणजे केसलिंगयपल्ली गावाने हा निर्णय घेतल्यानंतर जवळचे इतर गावही प्रेरित झाल्याचं दिसत आहे. या गावाने गावाबाहेर मात्र असा कोणताही बोर्ड लावलेला नाही. गावाने घेतलेल्या या निर्णयाविरोधाच प्रशासनानेही कोणती कारवाई केलेली नाही. हा आमचा स्वत:चा निर्णय असून प्रशासनाचा त्यावर आक्षेप असण्याचा प्रश्नच नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A village of andhra pradesh declares hindu village
First published on: 01-05-2018 at 18:15 IST