आम आदमी पक्षाने (आप) अखेर गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे गुजरात राज्याचे प्रभारी गोपाल राय यांनी ही माहिती दिली. यासाठी पक्षाकडून ‘गुजरात नो संकल्प’ या नावाने निवडणूक प्रचार अभियानाची सुरूवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने येत्या १७ सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथे एका रोड शोचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच प्रचाराची औपचारिक सुरूवात होणार आहे.

गोपाल राय म्हणाले, राज्यात अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. पण गुजरातच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. काँग्रेस पक्ष विखुरला गेला आहे. अशावेळी गुजरातमध्ये जनतेला एक पर्याय हवा आहे. तो पर्याय आम आदमी पक्ष देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिथे जिथे आमचा पक्ष विस्तारत जाईन तिथे आम्हाला चांगले उमेदवार मिळतील आणि पक्ष तेथून निवडणूक लढवेल, असे गोपाल राय यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

प्रत्यक्षात आपकडून पंतप्रधान मोदींना त्यांच्याच राज्यात पराभूत करण्यासाठी २०१५ पासून रणनिती बनवण्यात येत आहे. पण यावर्षी पंजाब आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर गुजरात निवडणूक लढवण्यावर संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, दिल्लीतील बवाना येथील पोटनिवडणुकीत विजय झाल्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच बळावला आहे. बवानामध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या गोपाल राय यांच्याकडेच गुजरातची जबाबदारी आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत.