नवी दिल्ली : लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अमीर रशीद अली याला दिल्ली न्यायालयाने १० दिवसांची एनआयए कोठडी सुनावली. अलीवर डॉ. उमर नबीबरोबर दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप आहे.
दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला संध्याकाळी सातच्या सुमाराला झालेल्या बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली ह्युंदाई आय१० कार त्याच्या नावावर नोंदवलेली आहे. अली हा जम्मू-काश्मीरच्या पम्पोरचा रहिवासी असून त्याला रविवारी नवी दिल्लीतून अटक करण्यात आली होती. ह्युंदाई आय१० कारची खरेदी प्रक्रिया सोपी करण्यासाठी अली दिल्लीला आला होता, ती नंतर स्फोटासाठी वापरण्यात आली, असा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) आरोप आहे. ही कार डॉ. नबी चालवत होता.
अलीला सोमवारी सकाळी ११.३०च्या सुमाराला कडक बंदोबस्तात पतियाला न्यायालय संकुलातील मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू बजाज चंदना यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. ही सुनावणी बंद कक्षात झाल्यामुळे माध्यम प्रतिनिधींना न्यायालयात प्रवेश देण्यात आला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एनआयए’ न्यायालयाकडे अलीच्या चौकशीसाठी त्याच्या कोठडीची मागणी केली. ती न्यायाधीश चंदना यांनी मान्य करत अलीला १० दिवसांची एनआयए कोठडी सुनावली.
न्यायालय संकुलात आणि अवतीभवती दिल्ली पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे जवान (आरएएफ) तैनात करण्यात आले होते. तसेच, दंगलविरोधी पथकेही तैनात करण्यात आली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
