निवडणूक आयोगाकडून ईलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) हॅक करण्यासाठी हॅकाथॉनचे आयोजित करण्यात आल्यानंतर आता आम आदमी पक्षाकडून हॅकाथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाने ३ जून रोजी हॅकाथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आम आदमी पक्षाने ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याचे आरोप अनेकदा केले आहेत. यासोबतच इतरही पक्षांनी ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळेच आम आदमी पक्षाने हॅकाथॉनचे आयोजन केले आहे.
काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेत ईव्हीएममध्ये सहजपणे फेरफार केली जात असल्याचा दावा केला होता. यासाठी आम आदमी पक्षाने एका ईव्हीएमच्या माध्यमातून डेमो दाखवला होता. आम आदमी पक्षाने वापरलेले तेच मशीन हॅकाथॉनसाठी वापरले जाणार आहे. आम आदमी पक्षाने ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र तरीही निवडणूक आयोगाचे ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हान आम आदमी पक्षाने स्वीकारलेले नाही. आम आदमी पक्षाने ईव्हीएम खोलून मदरबोर्ड दाखवला जावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाची मागणी फेटाळली. यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.
‘हॅकाथॉनमध्ये हॅकर्सला संपूर्ण सूट दिली जाते. हॅकाथॉनचा अर्थच तो असतो,’ असे आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी म्हटले. ‘लोकशाहीवरील विश्वास कामय राहण्याण्यासाठी आम्हाला पूर्ण सूट देण्यात यावी आणि हॅकाथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी निवडणूक आयोगाने आम्हाला द्यावी. ईव्हीएम खोलण्याची संधीच दिली नाही, तर ईव्हीएम हॅक करता येणार नाही. ईव्हीएममध्ये फेरफार करण्याचे १०० प्रकार आहेत. यातील एक प्रकार आम्ही दिल्ली विधानसभेत करुन दाखवला होता,’ असेदेखील संजय सिंह यांनी म्हटले.