अनेक अफवांवर मात करीत आम आदमी पक्षाने गुरुवारी दिल्ली विधानसभेत बहुमत सिद्ध केले. ७० आमदारांच्या विधानसभेत केजरीवाल यांनी स्वपक्षाच्या २८ व काँग्रेसच्या आठ आमदारांसह बहुमतासाठी लागणारा ३६ चा आकडा गाठला. काँग्रेसशी हातमिळवणी केली असली तरी प्रमुख विरोधी पक्ष भाजपच्या आक्रमकतेचा सामना केजरीवाल यांना करावा लागणार आहे.
आठ आमदारांसह ‘आप’ला पाठिंबा देणारा काँग्रेस पक्ष कोणत्याही क्षणी पाठिंबा काढून घेईल, असे वृत्त अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीपासून पसरले होते. ते सपशेल फोल ठरले. दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व सभागृह नेते अरविंदर सिंह लवली यांनी ‘आप’ला पाठिंबा घोषित केला. त्यानंतर झालेल्या विश्वासमत ठरावात ‘आप’च्या बाजूने ३७, तर विरोधात ३२ मते पडली. ठरावापूर्वी सुमारे चार तास चर्चा झाली. केजरीवाल यांनी चर्चेला उत्तर देताना आम आदमीच्या हातात सत्ता आली असून त्याच्या बाजूने उभे राहायचे की विरोधात याचा निर्णय सभागृहातील सदस्यांनी घ्यायचा आहे, अशा शब्दांत आवाहन केले. त्यांनी ‘आप’ची १७ कलमी योजनाही सभागृहात मांडली.

भाजपची टीका
भाजपचे आमदार व विरोधी पक्षनेते डॉ. हर्षवर्धन यांनी मात्र केजरीवाल यांना सभागृहात खडे बोल सुनावले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, त्यांच्याशीच हातमिळवणी कशी काय केलीत, असा सवाल हर्षवर्धन यांनी विचारला. ते म्हणाले की, ‘निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्यांशी चर्चा केली. राजकारण करणार नाही, असे म्हणता म्हणता आपने सत्ता स्थापन केली. ज्यांना भ्रष्टाचारी म्हटले त्यांच्यासोबत युती करणे, हा राजकारणाचा भ्रष्ट नमुना आहे.’