उर्दू भाषेवरून भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या पाकिस्तानी महिलेची आपचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी ‘शाळा’ घेतली आहे. तुमच्या देशात तुम्हाला नावाशिवाय काही मिळालं नाही, सगळं काही भारताकडून मिळालेलं आहे, असं जबरदस्त उत्तर विश्वास यांनी या महिलेला दिलं आहे. विश्वास यांच्या या उत्तरानं नेटकरी खूपच खूश झाले आहेत. त्यांनी विश्वास यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘इसे कहते है, हिंदुस्तानी शेर…’ अशा शब्दांत यूजर्स विश्वास यांची स्तुती करत आहेत.

@mahnoor या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. ते एका पाकिस्तानी महिलेचं असल्याचं सांगितलं जात आहे. या ट्विटमधून भारतीयांची खिल्ली उडवण्यात आली होती. हे भारतीय आमची उर्दू सुधारत आहेत, असं त्यात म्हटलं आहे. त्यावर इतर पाकिस्तानी यूजर्सनेही भारतीयांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. महनूरच्या ट्विटवर भारतीय यूजर्सही संतापले. त्यांनी आक्षेप घेत उर्दू कधीपासून पाकिस्तानची झाली. कधी दिल्लीत अमीर खुसरो यांच्या मजारवरही या, तेव्हा तुम्हाला समजेल, असं ट्विट करून काही यूजर्सनं पाकिस्तानी महिलेला सुनावलं.
पाकिस्तानी महिलेचं हे ट्विट तुफान व्हायरल झालं. कुमार विश्वास यांच्या नजरेस ते पडलं. विश्वास यांनी या पाकिस्तानी महिलेला चांगलंच सुनावलं. या सडेतोड उत्तरानं विश्वास यांनी भारतीय यूजर्सची मने जिंकली. ”मोहतरमा, जगह बदलने से पुरखे नहीं बदला करते, आप के मुल्क का अपना बस नाम है..बाकी सब हिंद का कर्ज है, चाहे उर्दू हो या तारीख।” असं ट्विट विश्वास यांनी केलं. विश्वास यांनी केलेल्या या ट्विटमुळे त्यांच्यावर भारतीय यूजर्सनं कौतुकाचा वर्षाव केला. याला म्हणतात हिंदुस्तानी शेर…एका पंजात काम तमाम…असं एका यूजर्सनं म्हटलं आहे.