AAP leader Saurabh Bharadwaj claims PM Modi did photo-op with Delhi Blast injured patient आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाच्या घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि रेखा गुप्ता यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. येथे त्यांचे जखमींबरोबर संवाद साधतानाचे फोटो समोर आले होते. दरम्यान भारद्वाज यांनी पंतप्रधानांच्या रुग्णालयाच्या भेटीपूर्वी एका रुग्णाची ड्रेसिंग बदलली गेली असा दावाही केला आहे.

भारद्वाज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दोन फोटो शेअर केले आहेत. भारद्वाज यांच्या मते मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात त्याच रुग्णाला भेट दिली, फक्त तो रुग्ण नवीन कपडे आणि नवीन प्लास्टर लावलेला दिसून येत आहे.


“११ नोव्हेंबर रोजी आधी मुख्यमंत्री रेखा गुप्ता रुग्णाला भेटल्या. दुसऱ्या दिवशी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान मोदी त्याच रुग्णाला भेटले. नवीन कपडे, हाताला नवे प्लास्टर,” असे भारद्वाज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटातील जखमींची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी या कटाच्या मागे असणाऱ्यांना शिक्षा मिळवून देणार असल्याचेही स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हणाले होते की, “एलएनजेपी रुग्णालयात गेलो आणि दिल्ली स्फोटात जखमी झालेल्यांची भेट घेतली. प्रत्येकाच्या जलद बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे. या षडयंत्रामागे जे कोणी असतील, त्यांना शिक्षा मिळेल!”

भूतानहून परतल्याबरोबर पंतप्रधान मोदी हे एलएनजेपी रुग्णालयात पोहचले होते आणि त्यांनी तेथे जखमी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अधिकारी आणि डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली.

दरम्यान दिल्लीत लाल किल्ल्याच्या जवळ गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या स्फोटातील मृतांची संख्या १३ झाली आहे. एका जखमी व्यक्तीचा एलएनजेपी रुग्णालयात मृत्यू झाला. सरकारने या स्फोटाच्या घटनेचा उल्लेख दहशतवादी घटना असा केला आहे.

अधिकाऱ्यांच्या मते डॉक्टर उमर नबी हा स्फोटकांनी भरलेली कार चालवत होता, आणि बाबरी मस्जिद पाडली त्या दिवशी म्हणजे ६ डिसेंबर रोजी हल्ल्याचा त्याची योजना होती. अधिकाऱ्यांच्या मते संशयिताला मुंबईत २००८ साली झालेल्या हल्ल्याप्रमाणे घटना घडवून आणायची होती.

दिल्ली सरकारने या स्फोटात मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. एका अधिकृत निवेदनात, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की या स्फोटात कायमस्वरूपी अपंग झालेल्यांना ५ लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्यांना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना २०,००० रुपये मदत दिली जाईल.