दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार दिनेश मोहानिया यांच्या श्रीमुखात त्यांच्याच मतदारसंघातील एका महिलेने भडकाविल्याची घटना घडली. आमदार दिनेश मोहानिया आपल्या मतदार संघातील पाणीपुरवठ्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेले होते. पाण्याच्या अपुऱया पुरवठ्यामुळे संगम विहार परिसरातील जनता त्रस्त झाल्याचे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोहानिया यांच्या लक्षात आणून दिले होते. त्यानुसार समस्या जाणून घेण्यासाठी तेथील जनतेशी चर्चा करण्यासाठी दिनेश मोहानिया गेले असता तेथील एका महिलेने मोहानिया यांच्या सरळ श्रीमुखात भडकावली.
मोहानिया म्हणाले की, त्याठिकाणी पाणी माफियांचे जाळे असल्याचे समजले आहे. महिलांना पुढे करून पाणी माफियांकडून हे कृत्य घडवून आणले गेले आहे. या भागात पाणी माफियांचे राज्य असल्याचे एका चित्रफीतीच्या माध्यमातून सिद्ध करू शकतो असेही मोहानिया म्हणाले.