महिला आमदाराविरुद्ध शेरेबाजी
आम आदमी पार्टीच्या (आप) आमदार अलका लांबा यांच्याबद्दल अशोभनीय वक्तव्य केल्याबद्दल भाजपचे आमदार ओ. पी. शर्मा यांच्यावर बुधवारी आपने जोरदार हल्ला चढविला. शर्मा यांची दिल्ली विधानसभेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी आपने केली असून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आपच्या महिला आमदार सभागृहात उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले.
अलका लांबा यांच्याबद्दल असंसदीय भाषा वापरल्याबद्दल भाजपनेही शर्मा यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही आपने केली आहे. दिल्ली विधानसभेत अशा प्रकारचे आमदार निवडून आले आहेत हे लज्जास्पद आहे, महिलांना अशा प्रकारची वर्तणूक देणारे राष्ट्र भाजपला हवे आहे का, असा सवालही आपने केला आहे. भाजप शर्मा यांच्या पाठीशी आहे की त्यांच्यावर कारवाई करणार आहे, ते स्पष्ट करावे, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका वार्ताहर परिषदेत सांगितले.
या वेळी लांबा यांच्यासह आपच्या महिला आमदार हजर होत्या. रात्रीच्या निवाऱ्यांबाबत चर्चा सुरू असताना शर्मा यांनी अलका लांबा यांच्याबद्दल अशोभनीय वक्तव्य केले, त्यामुळे अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी त्यांना निलंबित केले. दरम्यान, ‘आप’च्या कार्यकत्यांनी मोठय़ा संख्येने काकरडोमा येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. आपच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करताना महिलांचा होणारा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. तर काही कालावधीसाठी निलंबन न करता कडक कारवाईची मागणी कार्यकर्त्यांनी केली. भाजप आमदाराच्या घराबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.