भारतीय वायुसेनेचे दिग्गज पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ग्रुप कॅप्टन या पदावर बढती देण्यात आली आहे. अभिनंदन वर्धमान यांना आयएएफकडून ग्रुप कॅप्टन पदावर बढती देण्यात आली आहे आणि ते लवकरच त्याची नवीन रँक सांभाळतील, असे सूत्रांनी एएनआयला सांगितले. ग्रुप कॅप्टन हा भारतीय सैन्यात कर्नलच्या बरोबरीचा असतो. अभिनंदन हे श्रीनगर स्थित ५१ स्क्वॉड्रनचा भाग होते.

वर्धमान यांची कामगिरी

भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी फायटर विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात भारतीय हवाईदल आणि पाकिस्तानी हवाई दलाच्या विमाने समोरासमोर आली. यावेळी अभिनंदन यांनी मिग २१ बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ १६ फायटर विमानावर वर आर- ७३ मिसाइल डागले. या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले अॅमराम मिसाइल वर्धमान यांच्या मिग २१ बायसन विमानाला धडकले.

त्यानंतर अभिनंदन यांचे मिग-२१ पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. भारताने चहूबाजूंनी पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सोपवले.