दिवंगत अमूर्त चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या दोन चित्रांनी दोन लिलावांमध्ये एकाच दिवशी १२ कोटींहून अधिक रुपयांची बोली मिळवली आहे! ‘दक्षिण आशियाई आधुनिक व समकालीन कला’ विकू पाहणारे दोन लिलाव ‘सदबीज’ आणि ‘ख्रिस्टीज’ या लिलावसंस्थांनी लंडनमध्ये मंगळवारी पुकारले, त्यापैकी ‘सदबीज’ लिलावात सहा लाख ९८ हजार ५०० ब्रिटिश पौंडांची (किमान ६ कोटी ३३ लाख रुपयांची) बोली मिळवली आहे! विशेष म्हणजे गायतोंडे यांनी निर्धन असताना- १९६२ साली रंगविलेले हे चित्र कुणा धनिकाच्या अडगळीत पडून होते.
‘ख्रिस्टीज’च्या लिलावात गायतोंडे यांच्या दुसऱ्या चित्राला सहा लाख २५ हजार ८७५ पौंड (पाच कोटी ६७ लाख रुपये) इतकी बोली मिळाली. हे चित्र १९५८ सालचे, गायतोंडे यांच्यावरील पॉल क्लीचा प्रभाव दाखविणारे आहे. दोन्ही लिलावांत गायतोंडेच सरस ठरले याचे एक कारण असे की, २०१४ मध्ये गायतोंडे यांचे सिंहावलोकनी प्रदर्शन न्यूयॉर्कच्या ‘गुगनहाइम म्युझियम’मध्ये त्यांच्या निधनानंतर १३ वर्षांनी भरते आहे. हा मान मिळवणारे गायतोंडे हे पहिलेच भारतीय आधुनिक चित्रकार असल्याने या प्रदर्शनात आपल्या मालकीची चित्रेही दिसावीत यासाठी जगभरच्या संग्राहकांची स्पर्धाच लागली आहे, असे सांगितले जाते.
‘सदबीज’च्या लिलावात मकबूल फिदा हुसेन यांच्या ‘झूला’ या चित्राने दोन लाख ४२ हजार ५०० पौंडांची (२.१९ कोटी रु.) बोली मिळवली. पण गायतोंडे यांचे चित्र अंदाजित किमतीपेक्षा दुपटीहून अधिक बोली मिळवणारे ठरले. हुसेन यांच्यानंतर भूपेन खक्कर यांच्या चित्राला सर्वाधिक बोली (१८२५०० पौंड- १.६५ कोटी रु.) मिळाली. हुसेन यांची नऊ चित्रे ख्रिस्टीजच्या तर १० सदबीजच्या लिलावात होती. इतकी चित्रे विक्रीस आल्यानेच बोली कमी झाल्या असाव्या, अशीही चर्चा आहे.