जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जी परिस्थिती आहे. त्यामुळे भारताबरोबर अपघाती युद्धाची शक्यता नाकारता येत नाही असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. युद्धाचे काय परिणाम आहेत याची भारत आणि पाकिस्तान दोघांना कल्पना आहे. पण सध्याची परिस्थिती कायम राहिली तर अपघाती युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. काहीही घडू शकते असे कुरेशी बुधवारी जीनेव्हामध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्काचे उच्चायुक्त मिशेल बॅचलेट हे प्रदेशाला भेट देण्याचा विचार करत आहेत असे कुरेशी म्हणाले. जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी करणारे कुरेशी यांनी भारत आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भागाला भेट देण्याचे निमंत्रण बॅचलेट यांना दिले आहे. मिशेल बॅचलेट यांनी दोन्ही बाजूंना भेट द्यावी. तिथली परिस्थिती पाहून रिपोर्ट तयार करावा. त्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे, सत्य काय ते जगाला समजू शकेल असे कुरेशी म्हणाले.

तणाव कमी करण्यासाठी द्विपक्षीय चर्चेची शक्यताच त्यांनी फेटाळून लावली. सध्याचे वातावरण आणि भारत सरकारची विचारसरणी पाहता द्विपक्षीय चर्चेची शक्यता वाटत नाही असे मत कुरेशी यांनी नोंदवले. अमेरिकेचा प्रभाव लक्षात घेता त्यांची भूमिका महत्वाची राहू शकते असे कुरेशी म्हणाले.

काश्मीर प्रश्नावर भारताबरोबर चर्चेचा सल्ला

काश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावी ही पाकिस्तानची मागणी आहे. पण संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानला भारताबरोबर चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. एकप्रकारे अप्रत्यक्षपणे पाकची मागणी फेटाळून लावली आहे.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटेरेस यांना काश्मीरवरुन भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाची चिंता आहे.

हा तणाव आणखी वाढू शकतो अशी त्यांना भिती आहे. त्यांनी दोन्ही देशांना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केल्याचे ग्युटेरेस यांच्या प्रवक्त्याने सांगितले. मागच्या महिन्यात फ्रान्समध्ये जी ७ परिषदेच्या निमित्ताने अँटोनिओ ग्युटेरेस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर चर्चा केली होती. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यासोबत सुद्धा त्यांचे बोलणे झाले आहे अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे मुख्य प्रवक्ते स्टीफेन दुजारिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accidental war with india pakistan foreign minister shah mehmood qureshi kashmir article 370 dmp
First published on: 13-09-2019 at 14:12 IST