दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ख्यातनाम छायालेखक व्ही.के.मूर्ती यांचे निधन झाले, ते ९१ वर्षांचे होते. गुरूदत्तचा प्यासा व साहिब बिबी गुलाम या चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट छायाचित्रण केले होते. त्यांच्या पश्चात मुलगी छाया मूर्ती आहे.
मूर्ती हे दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलेले पहिले तंत्रज्ञ होते. भारतीय चित्रपटसृष्टीत दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वोच्च मानला जातो, १९६९ मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला. मूर्ती यांना २००८ मध्ये या पुरस्काराने गौरवण्यात आले. मूर्ती यांनी भारतातील पहिला सिनेमास्कोप चित्रपट ‘कागज के फूल’चे चित्रीकरण केले होते. गुरूदत्त यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी कॅमेऱ्याचा केलेला उपयोग सर्वोत्तम होता. त्यांनी ‘चौदहवी का चाँद’ या चित्रपटाचे केलेले चित्रण हा त्यांच्या कामगिरीचा एक आगळा नमुना होता. ‘प्यासा’ चित्रपटात ‘वक्त ने किया क्या हसी सितम’ या गाण्यात त्यांनी समांतर आरसे वापरून ‘बिम शॉट’ घेतला होता. कमाल अमरोही यांच्याबरोबर त्यांनी ‘पाकिजा’ व ‘रझिया सुलतान’ हे चित्रपट केले. ‘कागज के फूल’ व ‘साहिब बिबी और गुलाम’ या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. मूर्ती यांची एकूण कारकीर्द ४० वर्षांची होती,
त्यांनी पन्नासच्या दशकात गुरूदत्त बरोबर काम सुरू केले. नंतर त्यांनी श्याम बेनेगल यांची ‘भारत एक खोज’ ही मालिकाही चित्रित केली. १९९३ मध्ये त्यांनी कन्नडमधील ‘हुवा हान्नू’ हा चित्रपट केला. अ‍ॅमस्टरडॅम येथे २००५ मध्ये त्यांना चित्रपट अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. मूर्ती यांचा जन्म म्हैसूर येथे १९२३ मध्ये झाला. त्यांनी १९४३-४६ या काळात एस.जे. पॉलिटेक्निक या बंगळुरूच्या संस्थेतून छायालेखनाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला होता.