– ऐश्वर्या राज, धीरज मिश्रा

डेहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध मसुरीजवळ १४२ एकर जमिनीवर साहसी प्रकल्प उभारण्याचे कंत्राट प्रसिद्ध योगगुरू रामदेव बाबा यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्याशी संबंधित कंपनीने कसे पटकावले, याचा उलगडा ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या शोधबातमीद्वारे झाला आहे. या प्रकल्पासाठी निविदा दाखल करणाऱ्या तीनपैकी दोन कंपन्या बालकृष्ण यांच्या मालकीच्या होत्या तर, ज्या तिसऱ्या कंपनीने ते कंत्राट मिळवले, तिच्यात अवघ्या दोन महिन्यांत बालकृष्ण आणि त्यांच्या उरलेल्या कंपन्यांनी ताबा मिळवल्याचे समोर येत आहे.

मसुरीतील ब्रिटिशकालीन जॉर्ज एव्हरेस्ट इस्टेट पार्क येथील प्रकल्पात पर्यटकांसाठी असलेल्या विविध सुविधांची देखभाल करण्याच्या या कामासाठी नेमलेल्या राजस एअरोस्पोर्ट्स या कंपनीने उत्तराखंड सरकारला २०२३पासून वार्षिक एक कोटी रुपये शुल्क भरले. मात्र, २०२३-२४मध्ये १.१७ कोटी रुपयांचे उत्पन्न असलेल्या या कंपनीची उलाढाल एका वर्षातच ९.८२ कोटींवर पोहोचली, हे विशेष.

पर्यटनाला चालना देण्यासाठी उत्तराखंड पर्यटन विभागाने डिसेंबर २०२२मध्ये निविदा जारी केल्या. त्या प्रक्रियेत राजस एअरोस्पोर्ट्स ॲण्ड ॲडव्हेंचर प्रा. लि. या कंपनीखेरीज प्रकृती ऑरगॅनिक्स इंडिया प्रा.लि. आणि भरूवा ॲग्री सायन्स प्रा. लि. या कंपन्यांनी सहभाग घेतला. ‘योगायोग’ म्हणजे, प्रकृती आणि भरूवा या दोन्ही कंपन्यांमध्ये बालकृष्ण यांची ९९ टक्के मालकी आहे. निविदाप्रक्रियेच्या वेळीस राजसमध्येही बालकृष्ण यांची २५ टक्के हिस्सेदारी होती. पण ‘राजस’ला कंत्राट मिळताच पुढील काही महिन्यांतच बालकृष्ण यांची हिस्सेदारी ६९.४३ टक्क्यांवर पोहोचली. एवढेच नव्हे तर, प्रकृती आणि भरूवा यांनीही ‘राजस’मध्ये ‘आपला’ हिस्सा मिळवला.

या निविदाप्रक्रियेसाठीच्या अटी-शर्तींमध्ये ‘अन्य निविदाकारांशी संगनमत करणार नाही’ अशी हमी निविदाकारास द्यावी लागली होती. तसेच या अटींचा भंग झाल्यास संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, या अटी गुंडाळून संपूर्ण निविदाप्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप होत आहे. उत्तराखंड पर्यटन विभागाचे उपसंचालक अमित लोहानी यांनी ‘संपूर्ण प्रक्रिया खुली होती. त्यामुळे कोणीही सहभागी होऊ शकले असते. तसेच काही व्यक्तींचे अन्य कंपन्यांत समभाग असणेही वावगे नाही’ अशी प्रतिक्रिया दिली. याबाबत हिस्सेदारी आणि कंपनी कार्यान्वयाबाबत धोरणात्मक निर्णय पूर्णपणे कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालकांकडूनच घेतले जातात, असे स्पष्टीकरण ‘राजस’च्या प्रवक्त्यांकडून देण्यात आले.

बालकृष्णांची ‘माया’

रामदेवबाबा यांचे विश्वासू सहकारी असलेले बालकृष्ण हे पतंजली आयुर्वेद लि. या ६१९९ कोटींची उलाढाल असलेल्या कंपनीचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. मात्र, याखेरीज अन्य कंपन्यांमध्येही त्यांची मोठी हिस्सेदारी आहे. विशेष म्हणजे उत्तराखंडमधील पर्यटन विभागाचे कंत्राट मिळालेल्या राजस एअरोस्पोर्ट्सची हिस्सेदारी असलेल्या सर्व कंपन्या बालकृष्ण यांच्याच मालकीच्या आहेत.

महसुलात आठ पट वाढ

या प्रकल्पाच्या व्यवस्थापनाचे काम मिळाल्यानंतर ‘राजस’चे महसूली उत्पन्न एका वर्षांत आठपटीने वाढल्याचेही उघड झाले आहे. २०२२-२३ मधील कंपनीने नोंदवलेला १.१७ कोटींचा महसूल २०२४ मध्ये ९.८२ कोटींवर पोचला आहे. इतकेच नव्हे तर, तीन महिन्यांपूर्वीच उत्तराखंड हवाई वाहतूक विकास प्राधिकरणाच्या शटरसेवेचे कंत्राट या कंपनीने पटकावले आहे.