काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं. ‘हम तैयार है’ असं या सभेचं नामकरण करण्यात आलं.  या कार्यक्रमाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह देशभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून भाषण करताना राहुल गांधींनी महाराष्ट्रातील कार्यकर्ते खास असल्याचं म्हटलं.

राहुल गांधी म्हणाले, भारत जोडोच्या निमित्ताने कन्याकुमारी ते काश्मीर आम्ही चाललो. चार हजार किलोमीटरचा प्रवास केला. द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचं दुकान उघडलं.

“तुमच्या मनात हिंदुस्तानच्या लोकांसाठी प्रेम आहे. द्वेषाच्या बाजारात तुम्हाला प्रेमाचं दुकान उघडायचं असेल तर तुम्ही काँग्रेसी आहात. मी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो. कारण तुम्ही स्पेशल आहात. मी भारत जोडो यात्रेत चालत होतो. जसा मी महाराष्ट्रात आलो, तेव्हा मला जाणवलं की ही काँग्रेसची जमीन आहे. या भूमीवर लोकांना काँग्रेसची विचारधारा न समजावता समजते”, असं राहुल गांधी म्हणाले.

“आमची लढाई सुरू झाली तेव्हा महाराष्ट्रातून झाली होती. म्हणून आम्ही येथे नागपूरला आलो आहोत. तुम्ही सिंह आहात. तुम्ही कोणालाही घाबरू नका. तुम्ही सिंह आहात. तुमच्या मनाची लढाई ही तुमच्या विचारधारेची लढाई आहे. तुम्ही आणि आम्ही मिळून महाराष्ट्र आणि पूर्ण हिंदुस्तानात निवडणुका जिंकणार आहोत”, असाही विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“नाना पटोलेंनी प्रश्न विचारला आणि ते आऊट झाले!”

दरम्यान, आपल्या भाषणात राहुल गांधींनी नाना पटोलेंनी मोदींना प्रश्न विचारल्यामुळे ते बाहेर पडल्याचं सांगितलं. “नाना पटोलेंनी पंतप्रधानांना शेतकऱ्यांच्या बाबतीत एक प्रश्न केला होता. जीएसटीमध्ये शेतकऱ्यांचा काय हिस्सा असेल, असा तो प्रश्न होता. मोदींना प्रश्न योग्य वाटला नाही आणि पटोले आऊट झाले. त्यांची विचारसरणी ही राजांची विचारसरणी आहे. वरून येणाऱ्या आदेशांचं पालन तुम्हाला करावं लागतं. काँग्रेस पक्षात खालच्या स्तरातून आवाज येतो. आपला लहानात लहान कार्यकर्ता आपल्या कोणत्याही नेत्याला प्रश्न विचारू शकतो”, असं राहुल गांधी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपले कार्यकर्ते माझ्यासमोर येतात आणि म्हणतात राहुलजी, तुम्ही हे जे केलंय, ते मला आवडलं नाही. मग मी त्यांना समजावतो की अमुक कारणामुळे मी ती गोष्ट केली. मी त्यांचं ऐकून घेतो. त्यांच्या मताचा आदर करतो. हेही सांगतो की मी तुमच्या मताशी सहमत नाही, पण त्यांचं म्हणणं मात्र ऐकून घेतो”, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.