पीटीआय, बंगळुरू
‘ठग लाईफ’ हा चित्रपट कर्नाटकात ५ जून रोजी प्रदर्शित होणार नाही असे या चित्रपटातील अभिनेता कमल हासन यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाला सांगितले. तसेच त्यांनी न्यायालयात माफी मागण्यासही नकार दिला.
हासन यांनी कन्नड भाषेविषयी केलेल्या वक्तव्यावरून संतापलेल्या ‘कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’ने (केएफसीसी) हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची भूमिका घेतली. दरम्यान, या वक्तव्याबद्दल माफी मागितली असती तरी काम झाले असते असे म्हणत कर्नाटक उच्च न्यायालयाने हासन यांना मंगळवारी फटकारले.
हासन सहसंस्थापक असलेल्या ‘राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल’ या चित्रपट निर्माण कंपनीने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘केएफसीसी’बरोबर चर्चा झाल्याशिवाय कर्नाटकात चित्रपट प्रदर्शित करण्याची इच्छा नाही असे चित्रपट निर्मात्यांनी न्यायालयाला सांगितले.
वक्तव्यासंबंधी गैरसमज हासन
कन्नड भाषेसंबंधी आपण केलेल्या वक्तव्याबद्दल गैरसमज झाला असल्याचा खुलासा हासन यांनी मंगळवारी केएफसीसीला लिहिलेल्या पत्रात केला. आपल्याला कन्नड भाषेविषयी खरेखुरे प्रेम आहे असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. थोर अभिनेते डॉ. राजकुमार यांच्या कुटुंबाविषयी, विशेषत: शिवा राजकुमार यांच्याविषयी असलेल्या प्रेमातून मी जे बोललो त्यातून गैरसमज निर्माण झाला. तसेच आपले वाक्य संदर्भाविना वापरण्यात आले असेही हासन यांनी म्हटले आहे. ‘‘आपण सगळे एक आहोत आणि एकाच भाषा कुटुंबातील आहोत,’’ असे मला म्हणायचे होते असा दावा त्यांनी केला आहे.
असे विधान करायला तुम्ही इतिहासकार किंवा भाषातज्ज्ञ आहात का? कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेतून जन्म घेत नाही. केवळ एका माफीने ही परिस्थिती निवळली असती. कोणत्याही नागरिकाला भावना दुखावण्याचा अधिकार नाही. जल, जंगल आणि भाषा नागरिकांसाठी महत्त्वाच्या असतात.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.न्या. एम नागप्रसन्न