मध्य प्रदेश उच्च न्यायालयासमोर ३ दिवस धरणे आंदोलन करणारे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश राजेंद्रकुमार श्रीवास यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. मागील दीड वर्षांत चार वेळा त्यांची बदली करण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयासमोर धरणे आंदोलन केले होते. याबाबत मुख्य निंबधक सत्येंद्रकुमार सिंह म्हणाले, राजेंद्रकुमार श्रीवास यांना काल निलंबित करण्यात आले आहे. यासंबंधी आदेश जारी करण्यात आले असून उच्च न्यायालयाच्या प्रशासनिक समितीने श्रीवास्तव यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. निलंबन काळात श्रीवास हे नीमच येथील मुख्यालयातच राहतील. गोपनीयतेमुळे त्यांच्या निलंबनाच्या कारणांचा खुलासा करण्यास त्यांनी नकार दिला.

सिंह म्हणाले, श्रीवास यांच्या चुकीच्या वर्तणुकीची विभागीय कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे. १५ महिन्याच्या आत चौथ्यांदा बदली करण्यात आल्यामुळे श्रीवास उच्च न्यायालयासमोर १ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनास बसले होते. परंतु, तिसऱ्याच दिवशी त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठात विशेष कर्तव्यस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होते. परंतु, आंदोलनादरम्यानच त्यांची नीमच येथे बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ३ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन मागे घेतले होते. श्रीवास यांनी मंगळवारी नीमच येथे एडीजे म्हणून पदभार घेतला होता. त्यानंतर ४ तासाच्या आतच त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मी २ वाजता कार्यभार घेतला आणि सांयकाळी ६ वाजता मला निलंबित करण्यात आल्याचा फॅक्स आला, असे श्रीवास यांनी सांगितले. आपली चूक लपवण्यासाठी माझ्या निलंबनाचा आदेश काढण्यात आल्याचे सांगत त्यांनी रॉलेट अॅक्टचा हवाला दिला. ही दडपशाही असल्याचे सांगत मी माझ्यापरीने विरोध करणार असल्याचे त्यांनी म्हटले.