Aditya Thackeray Met Arvind Kejriwal : ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची आज पुन्हा भेट झाली. २४ फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर आले होते. तेव्हाही त्यांनी ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर, लागलीच तीन, साडेतीन महिन्यांनी पुन्हा भेट झाल्याने विरोधकांची मोट बांधण्याचं काम प्रगतीपथावर असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात आज ट्वीट करत माहिती दिली. ते म्हणाले की, “आज सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आमच्यासोबत खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि संजय सिंह उपस्थित होते. लोकशाही आणि आपली राज्यघटना धोक्यात आहे. आणि जमेल त्या मार्गाने आपण त्यांचं संरक्षण केलं पाहिजे”, असंही आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.

अभिनेत्री परिणती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे काल (१३ मे) सायंकाळी दिल्लीत गेले होते. यावेळीही आदित्य ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची भेट झाली. त्यानंतर, आज पुन्हा केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात भाजपविरोधी एकत्र येण्यासाठी विविध विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत. शरद पवार, ममता बॅनर्जी, नितिश कुमार यांनी विरोधकांच्या एकजुटीसाठी अनेकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवातही केली आहे. विरोधी पक्षांच्या या एकतेत आम आदमी पक्षही जाणार का हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, ठाकरे आणि केजरीवाल यांच्या वाढत्या भेटी गाठी पाहता तेही विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.