युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वर्तवली आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही असतील असे सूचक विधान त्यांनी केले आहे. गुरुवारी ते माध्यामांशी बोलत होते. टाइम्स नाऊने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

राऊत म्हणाले, महाराष्ट्र आदित्य ठाकरे यांना राज्याचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून स्विकारेल, कदाचित त्याचसाठी जनतेला ठाकरे घराण्यातील नव्या पिढीने निवडणूक लढवावी असे वाटत आहे. मात्र, आदित्य यांनी निवडणूक लढवावी किंवा नाही याचा सर्वस्वी निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. तरीही महाराष्ट्राला सध्या तरुण आणि नव्या विचारांच्या मुख्यमंत्र्याची गरज आहे, असे सांगायला राऊत विसरले नाहीत.

त्याचबरोबर राऊत यांनी काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते की, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडणून यावेत यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्नशील आहेत. तसेच स्वतः त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, त्यांनी निवडणूक लढवावी किंवा नाही हे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे ठरवतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अशीही चर्चा सुरु आहे की आगामी विधानसभेत भाजपा-शिवसेना युतीची सत्ता राखण्यात यशस्वी झाले तर आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, ठाकरे कुटुंबातील कोणीही व्यक्ती उपपद भुषावत नाही, तर नेहमीच प्रमुखपद भुषावतात.

जर अठ्ठावीस वर्षीय आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवली तर शिवसेनेच्या ५३ वर्षांच्या कारकिर्दीतील ते ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे पहिले व्यक्ती असतील.