पीटीआय, नवी दिल्ली
निवडणूक विश्लेषण संस्था ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’चे (एडीआर) सह-संस्थापक आणि पारदर्शक तथा नि:पक्षपाती निवडणुकांचे दीर्घकाळ पुरस्कर्ते असलेले जगदीप एस. छोकर यांचे शुक्रवारी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते.
२५ नोव्हेंबर १९४४ रोजी जन्मलेल्या छोकर यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी भारतीय रेल्वेमध्ये आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांनी दिल्ली विद्यापीठात व्यवस्थापन अभ्यास विद्याशाखेतून (एफएमएस) ‘एमबीए’ केले आणि नंतर अमेरिकेतील लुईझियाना स्टेट विद्यापीठातून ‘पीएचडी’ प्राप्त केली. छोकर हे १९८५ मध्ये अहमदाबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये रुजू झाले आणि २००६ मध्ये निवृत्त होईपर्यंत संघटनात्मक वर्तन क्षेत्रात अध्यापन केले. तेथे त्यांनी अधिष्ठाता आणि प्रभारी संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडली.
छोकर यांच्या निधनाबद्दल राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. प्राध्यापक जगदीप छोकर यांचे निधन दुःखद आहे. त्यांनी नेतृत्व केलेल्या ‘एडीआर’ने निवडणूक लोकशाहीचा उच्च दर्जा राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले, अशी भावना माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी ‘एक्स’वर व्यक्त केली. पारदर्शक निवडणुकांसाठी लढणाऱ्या छोकर यांनी वैद्यकीय संशोधनासाठी आपले शरीर दान केले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी ‘एक्स’वर म्हटले. ‘राजद’चे खासदार मनोज कुमार झा, निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव, तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष तसेच इतर मान्यवरांनीही छोकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
‘निवडणूक रोखे’ रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका
‘आयआयएम’ अहमदाबादचे निवृत्त प्राध्यापक असलेले छोकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने १९९९ मध्ये ‘एडीआर’ची स्थापना केली होती. गेल्या दोन दशकांतील भारतीय राजकारणात अधिक पारदर्शकता आणि विश्वासार्हता आणणाऱ्या अनेक ऐतिहासिक न्यायालयीन निर्णयांमध्ये ‘एडीआर’ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये २००२ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा समावेश आहे, ज्याद्वारे उमेदवारांना त्यांचे गुन्हेगारी खटले, मालमत्ता आणि शैक्षणिक पात्रता उघड करणे अनिवार्य केले होते. २०२४ मध्ये ‘निवडणूक रोखे’ योजना रद्द करण्याचा निर्णयही त्यात समाविष्ट आहे.