छळ किंवा गैरवर्तन करणा-या सज्ञान मुलाला आईवडील घराबाहेर काढू शकतात असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. हा निर्णय सर्वस्वी आईवडीलांवर अवलंबून आहे. जर ते भाड्याच्या खोलीत राहत असतील तरीदेखील ते मुला/मुलींना घरातून बेदखल करु शकतात असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीतील मद्यपानाचे व्यसन जडलेल्या तरुणाने आईवडिलांविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. संबंधीत मुलाला आईवडिलांनी घराबाहेर काढले होते. मुलाचे आईवडील दिल्लीतील सिव्हील लाईनमध्ये एका भाड्याच्या खोलीत राहत होते. हे घर त्याच्या वडीलांना ते काम करत असलेल्या ट्रस्टने भाडेतत्त्वावर दिले होते. या याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. २००७ मधील पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संपत्ती आणि जीवाच्या सुरक्षिततेसंदर्भातील कायद्याचा दाखला देत न्या. मनमोहन म्हणाले, मानसिक आणि शारीरिक छळ करणा-या मुलाला ज्येष्ठ नागरिक देखभाल लवाद घराबाहेर काढण्याचे आदेश देऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांनाही शांततेत आयुष्य जगता यावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे हायकोर्टाने सांगितले.

दिल्ली सरकारच्या कायद्यानुसार वृद्ध आईवडील मुलगा आणि मुलीला त्यांच्या संपत्तीतून बेदखल करु शकतात. पण हा नियम फक्त स्वतःच्या मालकीच्या संपत्तीमध्ये किंवा भाड्याच्या घरासाठी लागू असेल याविषयी स्पष्ट उल्लेख नव्हता. त्यामुळे सरकारने या कायद्यात सुधारणा करुन अॅक्शन प्लान सादर करावा असे हायकोर्टाने म्हटले आहे. संबंधीत क्षेत्रातील पोलीस ठाण्यातील अधिका-यांनी मुलाने तातडीने घर खाली केले की नाही याची खातरजमा करावी असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.